
श्रावण शुक्रवारी जिवती देवीची पूजा करतात. जिवती ही आपल्या मुला बाळांच रक्षण करते अशी पूर्वापार श्रद्धा आहे. माझी आजी खूप वृद्ध झाली तरी तिच्या आजोबा झालेल्या मुलांसाठी आणि घरातील सर्व मुलं जिथे आहेत तिथे सुखात राहोत म्हणून पूजा करायची. माझी आई देखील जिवती पूजन करायची आणि मला एकदम स्पेशल फिलिंग यायचं. कारण, आपल्या क्षेमकुशलासाठी आजच्या दिवशी पूजा आहे असं काहीसं वाटायचं.
मला मुलगी झाली आणि मीही श्रद्धेने श्रावण शुक्रवारी जिवती पूजन करू लागले. माझ्या लेकीला तेच स्पेशल फिलिंग द्यायची पण गम्मत वाटते. तिला उत्सुकता म्हणून जिवतीची गोष्ट सांगते. आजही या गोष्टीसारख्या किती तरी राण्या दुसऱ्याचे मूल चोरून आई होण्याचे सुख मिळवू पाहतात…ज्यांची मुलं त्यांच्यापासून दूर आहेत, त्यांना ही गोष्ट कदाचित ओळखीची, आपलीशी वाटेल.
एक मोठ्ठ आटपाट नगर होतं. राजा होता. पण दुर्दैवाने त्याला वारस नव्हता. तेंव्हा राणीने एका सुईणीला लालच देवून कोण गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर असेल तर तिचं बाळ मला आणून दे अशी योजना केली. त्या सुईणीने राज्यात लक्ष ठेवून अशी गरोदर स्त्री हेरून तिला मी मोफत तुझे बाळंतपण करेन मलाच बोलाव असे सांगून ठेवले. राणीने गरोदर असल्याचे सोंग घेतले…सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले की राजाला वारस येणार.
इकडे सुईणी ने त्या ब्राह्मण स्त्री च्या घरापासून राजवाड्यापर्यंत गुप्त भुयार बनवले. नऊ महिने संपताच, तिच्या बाळंत होण्याची वेळ आली…इकडे राणीनेही प्रसवकळाचे नाटक केले. ब्राह्मण स्त्रीने एका गोंडस पुत्रास जन्म दिला..परंतु, सुईण फार हुशार. तिने तिचे डोळे बांधले असल्याने तिला कळले नाही आणि याचाच फायदा घेत ते बाळ राजवाड्यात पोचवले गेले..राजाला पुत्ररत्न…राजकुमार आला..सर्वांना आनंद झाला…पण, या ब्राह्मण स्त्रीला मात्र तुला मृत बाळ झाले असे सांगून फसवले..किती दुःख कोसळले तिच्यावर. तरीही तिने स्वतःला सावरले. श्रद्धेने ती दर श्रावण शुक्रवारी जिवती पूजा करत असे आणि अक्षत टाकून म्हणे,” माझं बाळ जिथे कुठे आहे, तिथे सुखरूप असुदे.” योगायोगाने, त्या अक्षता राजकुमाराच्या डोक्यावर पडत. कोणाला याचे रहस्य समजून येइना.
दिवसामागून दिवस, वर्ष गेली. राजकुमार मोठा झाला. एके दिवशी तो शिकारीला गेला असताना, त्याची नजर या ब्राह्मण स्त्रीवर गेली. ती सुंदर होती..राजकुमार मोहित झाला..पण, त्याच वेळी त्याचा पाय तिथे उभ्या वासराच्या पायावर पडला..ते वासरू दैवयोगाने म्हणाले,”कोणां पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला?” तेंव्हा त्याची आई म्हणाली, “जो आपल्या आईवर मोहित होण्याचे पाप करू शकतो, त्याला तुझ्या शेपटीची काय काळजी?” राजकुमाराने हे बोलणे ऐकले, त्याला खूप लाज वाटली. या पापाचे प्रायश्चित्त म्हणून तो काशीस निघाला. वाटेत प्रवासामध्ये त्याने एका ब्राह्मनाघरि मुक्काम केला. त्या ब्राह्मणाला खूप मुले झाली, परंतु, ती जगत नव्हती; ५-६ वे दिवशी मृत्य पावत. त्या रात्री सटवी ब्राह्मणाच्या मुलाचा जीव घेण्यास आली. राजकुमार दारात झोपला होता. ती म्हणाली, “कोण झोपला आहे दारात?”. जीवती उत्तरली,” माझं बाळ आहे ते. त्याला ओलांडू देणार नाही मी.” ब्राह्मण खूप चिंतेत होता. की आज रात्री कदाचित आपले बाळाचा मृत्यू होणार. पण, त्याने हे बोलणे ऐकले आणि त्याला आनंद झाला. त्याचे मूल जगले. दुसरे दिवशी त्याने राजकुमाराचे आभार मानले की तुमच्यामुळे माझे बाळ जगले. आजचे दिवस अजून मुक्काम करावा. राजकुमाराने ते मान्य केले. पुढे राजकुमार काशीस गेला. आणि हां मुलगा मोठा झाला.
राजकुमाराने काशीयात्रा केली. पिंडदान करते वेळी पिंड घेण्यासाठी पाण्यातून दोन हात वर आले. त्याला याचे कारण उमजेना. तेथील पंडितांनी सांगितले, घरी गेल्यावर गाव जेवण घाल. तुला याचे कारण कळेल. त्याने परत येऊन ही गोष्ट आपल्या आई वडिलांना सांगितली व गावजेवणाचा बेत घातला. सर्व जण येऊ लागले. परंतु, राजकुमाराची खरी आई, ब्राह्मण स्त्री मात्र येयीना. तिला खास बोलावणे धाडले. ती परान्न घेत नसे. परंतु, खूप आग्रह केल्यावर ती कबुल झाली. पंगतीमध्ये जेवायला तूप वाढायला जसे राजकुमार समोर आला, तसे तिला पान्हा फुटला..राजकुमार ओशाळला. त्याला हे कळेना..राणीच्या लक्षात सर्व प्रकार आला, तिने सुईणीला बोलावून खात्री केली की ती हीच स्त्री आहे जिचे बाळ आपण चोरून आणले होते. राणीने मोठ्या कष्टाने ही गोष्ट राजकुमाराला सांगितली. राजकुमाराला खूप आनंद झाला. त्याने आपल्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यांना मोठ्या सन्मानाने मोठा राजवाडा बांधून दिला व सर्वजण सुखाने राहू लागले.
त्या ब्राह्मण स्त्री ने खूप श्रद्धा ठेवली, की आपले बाळ जीवित आहे व आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच भेटेल. ती श्रद्धा फळाला आली. तिला जसे तिचे बाळ सुखरूप भेटले, तसे आपली मुलेबाळे सुखरूप राहोत, आपल्या जवळ राहोत हीच प्रार्थना.
आज आपण पाहतो, राजे महाराजे नसतील, तरी ज्यांना पैशाचा वापर करून दुसऱ्याचे सुख ओरबाडून घेणे शक्य आहे अशा प्रवृत्तीचे लोक आजही अस्तित्वात आहेत व ते तसे करतात देखील. परंतु, देव किंवा जी एक अदृश्य शक्ती आहे, ती कधीना कधी पीडिताला न्याय नक्कीच मिळवून देते.
या गोष्टी मधील व्रताला काही लोक अंधश्रद्धा, कर्मकांड म्हणून कमी देखील लेखतील, परंतु, कोणीही हे नाकारणार नाही, की धर्म, जात पात, आधुनिक विचार इ., यापलीकडे जावून पाहाल, तर प्रत्येक आई बाप, आपल्या मुलांचे कुशलक्षेम आणि आनंदाचे दीर्घायुष्य याची प्रार्थना नक्कीच करतात.
माझ्या लेकीने मला ही गोष्ट ऐकून विचारले, “मम्मा, मी शिकायला म्हणून होस्टेलला गेले, तरी देखील माझ्या डोक्यावर तू टाकलेल्या अक्षता पडतील?”..म्हंटलं, “हो बाळा, तू कितीही लांब गेलीस, तरी माझी प्रार्थना, माझे आशीर्वाद, या रूपात त्या अक्षता सतत तुझ्या डोक्यावर असतील.” यावर ती खुदकन हसली, आणि कुशीत शिरली.