एक महिन्याहून अधिक काल लोटला. पंढरीच्या दिशेने चाललेले वारकरी वाटेवरच्या गावांमध्ये भक्तिरसाची पेरणी करत आज अखेर पंढरपुरी पोहोचले. सोशल मिडिया मुळे आपण ही त्या वारी मध्ये सामील झाल्याचे फिलिंग आले..आणि ज्या दिवसाची आपण सगळे आतुरतेने वाट पाहतोय तो दिवस म्हणजेच ‘आषाढी एकादशी ‘ येवून ठेपला!
मराठी कुटुंबांमधे या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. श्रावणाची चाहूल, पावसासाठी विठूरायाची आळवणी, सामान्य जनतेला आपलासा वाटणांरा सावळा विठुराया, रांगेमध्ये उभे राहून घेतलेले विठुरायाचे दर्शन..त्याच्या गोष्टी, आणि नेहेमी घरात न होणारा उपवासाचा फराळ..अनेक कारणांसाठी मला लहानपणापासूनच या दिवसाचे आकर्षण आहे. माझे दोन्हीही आजोबा हे विष्णूभक्त! श्री विठुराया त्यांचेच अवतार. लहानपणी, साताऱ्याला गेलेलो असताना, संध्याकाळी आजोबा नेमाने विठोबाच्या देवळात जायचे. जास्त वेळ तिथे बसले, तर आजी आम्हाला धाडून द्यायची बोलवायला. इथून त्याची ओळख झाली. मग हळू हळू देवांच्या गोष्टी, संतांच्या गोष्टी यातून त्याचे मायाळू पण, भक्तांवरचं प्रेम, त्या प्रेमातून भक्तांना जगण्यासाठी मिळणारी उर्जा याचं गारुडच पडलं मनावर. अगदी गणपती मध्ये उंच सूर लावून “गरुडा वरी बैसोनी माझा कैवारी आला…हो माझा कैवारी आला” हे आळवताना सुद्धा विठुराया स्पेशलच वाटायचा कोणी! मग कधीतरी योग आलाच पंढरीला जायचा. जे गोष्टीमध्ये वाचलं होतं ते पंढरपूर याची देही याची डोळा पाहिलं. त्यानंतर अनेकदा योग आला पंढरपूरला जायचा…पण पहिली भेट अजूनही लक्षात आहे जशीच्या तशी.
माझ्या आई ची आई, खुपच धार्मिक. वर्षभर अखंड व्रत वैकल्य सुरु असायची. आणि त्याच्या धार्मिक गोष्टी पण तिच्या कडून ऐकायला मिळायच्या. मला वाटतं, धर्माचे संस्कार लहानपणीच होतात. व्हावेतच. आपला धर्म समजून घेण्यात आणि तो पुढे नेण्यात मला खरंच अभिमान वाटतो. इतर धर्मांचे सण जितक्या सहजतेने आपण साजरे करतो, तितक्याच किंबहुना त्यापेक्षा कैक जास्त पटीने आत्मीयतेने आपले सणवार देखील साजरे करावेत, किमान माहीत करून घ्यायला काहीच हरकत नाही !
लहानपणी आमच्या कडे काम करणारी सरुबाई, वारीला जावून आली की साखर फुटाणे आणि चुरमुऱ्याचा प्रसाद आणायची. तो खाताना, तिच्या पाया पडताना आपणच पंढरपूरला जावून आल्याचा, आणि पुण्य मिळाल्याचा आनंद व्हायचा. ते चुरमुरे हवेने सांदळलेले असायचे पण त्याची चव अक्षरशः अमृतासारखी.
माझं लहानपण कोकणात गेलं. घरच्या बागेत केळीची, नारळाची झाडं, बागेत पपई, रताळी, पेरू असे हौसेने काहीबाही होतेच. उपवास म्हणून कोकणात अनेक लोक केळीच्या पानावर जेवतात. आमच्या कडे उपवासाच्या दिवशी अनेक लोक केळीची पाने न्यायला यायचे. त्याच बरोबर घरच्या केळीच्या घडातली केळी देखील आवर्जून द्यायचो आम्ही, कच्ची हवी तर कच्ची, पिकलेली हवी तर पिकलेली ! मग मलाही वाटू लागलं, आपण का नाही फराळ करत केळीच्या पानावर? मग मी देखील भर पावसात, बागेत जावून केळीची टोकाची पाने आणून फराळाचा आग्रह करायचे. एके वर्षी चिपळूणला पूर आला होता आषाढीच्या दिवशी. तरीही मी पाण्यात उतरून केळीचे पान आणलेले आठवते आहे!! मSग.. तो एक सोहळाच असायचा. त्या केळीच्या पानावर गरमागरम भगर, आणि दाण्याची मस्त आमटी, त्यावर साजूक तूप, उपवासच थालीपीठ, उकडलेल्या बटाट्याची उपवासाची भाजी…सोबत, काकडीची कोशिंबीर, बागेतल्या नारळाची हिरवीगार चटणी, उपवासाचं घरगुती लिंबांचं लोणचं, घरी केलेल्या साबुदाण्याच्या पापड्या, बटाट्याचे पापड…आहाहा! आजपण त्या केळीच्या पानाची चव कित्ती प्रयत्न केला तरी स्टीलच्या ताटलीत घेवून खाल्लेल्या फराळाला येत नाही. कोणी फराळाचा बेत पाहून काही बोलेल तर माझं उत्तर असे, “एकादशी दुप्पट खाशी असं म्हणतातच!!” हा एकच उपवास मी इतका साग्रसंगीत फराळ करून करते. बाकी उपवासांच्या दिवशी स्वैपाक घराला सुट्टी हाच भाव असतो!
आजच आईचा फोन आला, “तुझी आठवण काढून सगळा बेत एकदम साग्रसंगीत करणारे बरं का!” एकदम कोकणातल्या घराची आठवण आली. आता केळीची पाने पैसे मोजून आणण्याचा उत्साह नाहीच उरला.
तुकोबाला वैकुंठाला न्यायला येणारे गरुड वाहन एका आषाढीला माझ्या पुण्यवान आजोबांनाही घेवून गेले. तेंव्हा पासून आषाढीला आधी त्यांची आठवण…आणि मगच विठ्रुरायाची!