गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू ….

आज गुरुपौर्णिमा! महान ऋषी आणि गुरु व्यास मुनी यांच्या आदराप्रीत्यार्थ आजचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरा करतो. आता मोठे झाल्यावर आपण कोणी अध्यात्मिक गुरु करून त्यांच्या मठात/ आश्रमात जावून पाया पडतो, पण, शाळेत आजच्या दिवशी सगळ्या शिक्षकांच्या पाया पडायचो त्याची गम्मत काही औरच होती. लहान असताना शाळेत आपल्या आवडत्या बाईना घराच्या बागेतील गुलाबाचे फूल किंवा घरच्या जाई -जुईचा गजरा नेऊन देणे यात जो आदर आणि प्रेम वाटायचं ते शब्दात सांगणे कठीण आहे. ज्यांचे आई वडील शिक्षक त्यांना तर हा दिवस खासाच लक्षात राहिला असेल. मी ते अनुभवलय. गुरुपौर्णिमा, टीचर्स डे, या दिवशी आमच्या घरी भरपूर फुले, किंवा पेढे असायचे…खूप मुले – मुली यायची आई बाबांना नमस्कार करायला..आई मग आदल्या दिवशी मुद्दाम खोबऱ्याच्या वड्या वगैरे करून ठेवायची, कारण तिच्या मते नमस्कार रिकाम्या हाती घेऊ नये…त्यांच्यावर इतकं प्रेम करणारे विध्यार्थी ही ग्रेट आणि त्यांच्या घरी जन्माला येणं हे माझं भाग्य. आपल्या आई- वडिलांच्या बद्दल इतरांचा इतका आदर पाहून मन आभाळाइतका भरून यायचं आणि ते पाहूनच माझ्या शाळेतील गुरूंचा जास्त आदर करू लागले मी.

हाताला धरून शाळेत मला माझ्या बाबांनीच पोहोचवलं कारण आईचे कॉलेज सकाळचे. बाबा त्यांच्या वेळा सांभाळून मला शाळेत अथवा क्लासला सोडणे, इ. कामे करत. म्हणजे तेच खरे माझे गुरु. अभ्यास घेणे, काहीही मागू ते पूर्ण करणे, हे आई इतकेच बाबा देखील करायचे. शाळेच्या सर्व गोष्टींची माहिती ठेवायचे…बिचारे “बाबा, तुमचं ड्रोइंग माझ्यापेक्षा खुपच छान आहे” असं म्हटलं की कितीही दमलेले असले तरी माझ्या जीवशास्त्राच्या व्यवसायातील उंदीर, बेडूक इ. काढून द्यायचे. ते स्वतः गणिताचे प्राध्यापक. म्हणून गणित जमलं. नाहीतर बोंबच होती माझी. त्याचं अभ्यास करून घेणं हि आई पेक्षा वेगळच. त्यांचा अभ्यास पहाटे. पहाटे लवकर उठवून स्वतः चहा करून द्यायचे. आणि मग मी पेंगत पेंगत गणिते, प्रमेये, असले नं झेपणारे प्रकार व्यायाम केल्यागत करायचे. आता आठवण पण नको वाटते अभ्यासाची, पण त्यांच्या हातचा चहा मात्र आठवावासा वाटतो कारण त्यात जे प्रेम होतं, त्याची तुलनाच नाही. आई आपली, सगळ्या भाषा आणि इतिहास याचा अभ्यास बिनबोभाट कधीपण घ्यायची. बहुतेक वेळा आमचा मायलेकींचा अभ्यास स्वयंपाकघरात व्हायचा. ती पोळ्या- भाकरी करता करता, हिंदी, संकृत, इंग्रजीचे व्याकरण, मराठीचे निबंध…सगळं आरामात. पण, परवाच ह्या शब्दाचा समास सोडवला होता, इतक्यात कसं विसरलीस? हे ही ऐकवायची. तिच्या मते पाठांतराला पर्याय नाही..मला त्याचा जाम आळस..तिच्या वडिलांच्या कडक शिस्तीमुळे तिचं पाठांतर इतकं चांगलं झालं, हे कळल्यापासून मी आजोबांकडून संस्कृत वगैरे शिकण्याच्या फंदात पडले नाही. कारण, त्यांच्यासमोर “नाही” या शब्दाला जागाच नव्हती. पण, त्यावेळी सर्व भाषांमध्ये पहिल्या ३ मध्ये येण्याचा मान आई  मुळे मिळाला. तेंव्हा गुरु म्हणून आई- बाबांना धन्यवाद म्हणण्याची पद्धत नव्हती, अक्कल पण नव्हती. चांगले मार्क्स मिळालेले पेपर घेऊन येऊन दोघांच्या गळ्यात पडायचे…आजही तेच करते. कोणी चांगलं म्हंटलं, कौतुक केलं, की आई- बाबांना मिठी मारायची….त्यांच्याच मुळे मी ‘मी’ आहे!!

प्राथमिक शाळेत मला नेहेमी सगळ्याच बाई, आताच्या भाषेत टीचर, आवडायच्या. कारण, नुसत गोड बोलून कौतुक करनाऱ्या बाईंच्या बरोबरीने लांब पट्टीने फटके देणं हेही गरजेचं होतं…अगदी प्रामाणिकपणे सांगते. मी खूप फटके खाल्ले आहेत. निम्मे वेळा गृहपाठ करायला विसरले म्हणूनच मार खाल्ला आहे. जरा वरच्या वर्गात गेल्यावर, मागच्या बेंच वर बसून गप्पा मारल्या म्हणून पण फटके खाल्ले…तर कधी, वर्गाबाहेर उभी राहिले…मी कधीही या शिक्षा घरी लपवल्या नाहीत. बिनधास्त सांगितलं आई ला. तिची प्रतिक्रिया ठरलेली असायची,”मी तू जातेस त्या शाळेत सुरुवातीला शिकवलं आहे. तिथले सगळे शिक्षक माझे जुने सहकारी आहेत. ते रागावले, म्हणजे तुझीच चूक असणार. पुढच्या वेळी पुन्हा असं करू नकोस म्हणजे झालं.” शाळेत शिक्षा झाली म्हणून घरी मार कधीच पडला नाही…कदाचित त्यामुळेच कधी लपवा- लपवीची गरज पडली नाही आणि सवय ही लागली नाही. मला आज माझे विद्यार्थी जेंव्हा आई- वडिलांपासून काही लपवताना दिसतात तेंव्हा मी त्यांना रागावते. कारण, जी गोष्ट आपण सांगायला हवी, ती जर इतरांकडून आईला कळली तर तिला जास्त दुःख होतं.

तेंव्हा एक क्रेझ असायची. कोणत्याही शिक्षकाचा फेवरीट विद्यार्थी होण्याची. म्हणजे, त्या शिक्षकांच्या तासाला त्यांनी आपल्यालाच  फळा पुसायला सांगणे, खडू आणायला सांगणे, कविता किंवा धडा वाचायला सांगणे, अस काही काही. मलाही ती क्रेझ होती. आता माझी मुलगी प्राथमिक शाळेत आहे. लाडीक तक्रार करते कधी कधी, ” मम्मा, त्या टीचर ची मी इतकी लाडकी आहे की सगळी म्हणजे सगळी कामं मलाच सांगतात त्या…सारखं वर- खाली जावून माझे पाय दुखतात.” मी एक धपाटा घालते मग तिला, म्हणते,” अग, नशीब लागतं तेंव्हा असं लाडके पण वाट्याला येतं. काही हरकत नाही पाय दुखले तर मी चेपेन तुझे पाय.”

पुढे कॉलेजला गेल्यावर तर मज्जाच होती. आई बाबा त्याच कॉलेज मध्ये प्राध्यापक. म्हणून लाड खुपच झाले. पण, तितकंच बारीक लक्ष पण ठेवायचे सगळे…त्यामुळे फारसं कॉलेज लाईफ एन्जॉय वगैरे नाही करता आलं. कारण, एखादे लेक्चर बुडवले, की लगेच चौकशी..”आज तुमची मुलगी दिसली नाही वर्गात”…पण, कधी राग नाही आला त्यांचा…त्यात माया जास्त होती ! आज त्या सगळ्यांची फार आठवण येते. कारण, जेंव्हा पुढील शिक्षणासाठी पुण्याला आले, तेंव्हा ९९ % शिक्षक हे “मी बरा, माझे काम बरे” असेच वाटायचे. उरलेल्या १% शिक्षकांनी मात्र माझे ‘लाईफ टाईम गुरु’ ची जागा घेतली.

शिक्षकी पेशा पिढीजात असल्यासारखी, मी वकिलीचे शिक्षण घेवून सुद्धा कॉलेज मधेच लागले नोकरीला. तेच वातावरण इतकं रक्तात भिनलं आहे..की दुसरीकडे करमतच नाही जणू. माझ्या आई बाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पहिल्या दिवसापासून हा व्यवसाय प्रचंड मनापासून सचोटीने केला. त्यांच्या इतकं नसेल, पण भरभरून प्रेम दिलं माझ्या विद्यार्थ्यांनीही, हे माझं भाग्य. आता सोशल मिडिया मुळे दूरदूरचे जुने जुने विद्यार्थी देखील संपर्कात आहेत, राहतात..त्यांची प्रगती पाहून मस्त फिलिंग येतं. काय ते नक्की सांगता येत नाही….पण आपल्याच घरातील कोणाची भरभराट होतेय हा आनंद होतो. काहीजण आवर्जून आज, किंवा टीचर्स डे ला मेसेज करतात, फोनही करतात. छान वाटत. मी ही माझ्या काही शिक्षकांना, मित्र -मैत्रिणींना, ज्यांनी वेळोवेळी काही शिकवलं , योग्य मार्गदर्शन केलं त्यांना आज आवर्जून आठवण काढून फोन करते, मेसेज करते. कारण, आयुष्यात सगळ्यात मोठे गिफ्ट कोणी आठवणीने तुमची आठवण ठेवणे हेच असते!

 

 

 

 

Published by

MyThinkingMug

Happy Soul ...who loves to connect & express

One thought on “गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू ….”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s