आला श्रावण श्रावण…

आला श्रावण श्रावण…

आज श्रावण शुद्ध प्रतिपदा. श्रावण मासाची सुरुवात. हिंदू धर्मामध्ये या महिन्याला खूप महत्व आहे. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, जातींमध्ये, चालत आलेल्या रुढी –परंपरांनुसार या महिन्यात वेगवेगळी व्रत वैकल्ये केली जातात. काहींची यावर अपरंपार श्रद्धा असते, तर काहींना हे कर्मकांड वाटत. लहानपणापासून या श्रावणाची एक वेगळीच उत्सुकता वाटत आली आहे. आजी, आत्या, काकू, आई, मावशी, शेजारी पाजारी राहणाऱ्या स्त्रिया, मैत्रिणी, यांच्या कडून वेगवेगळ्या सणांचे संमिश्र संस्कार होत गेले. पण, आई ही तर पहिली गुरु…सर्वच बाबतीत. आई देखील तिच्या लहानपणापासून तिच्या घरातील स्त्रियांच्या संस्कारात वाढलेली. थोड्याश्या कर्मठ कुटूम्बामधली. तरीही नोकरी सांभाळून तिला जितकी आपली संस्कृती जपता आली, तितकी तिने जपली आणि आपल्या मुलींनाही त्याची ओळख करून दिली. माझी आई नोकरी आणि घर सांभाळणाऱ्या पिढीतली. पुष्कळ तर्कसंगत विचार करणारी. तिने अंधश्रद्धेने कधीही कोणतीही व्रते केली नाहीत. पूर्ण श्रद्धेने पण त्यातील सार जाणून, शास्त्रीय भाग जाणून केली. आम्हीही तसेच करावे हा आग्रह. अजूनही तिला काही गोष्टीत शंका असेल, तर प्रथम शंका निरसन करून घेते कोणा  पंडितांकडून, जाणकारांकडून, आणि मग पूर्ण मन लावून ती धार्मिक गोष्ट करते.

मी आस्तिक आहे. सश्रद्ध आहे. धार्मिक गोष्टी मला आवडतात. पण, त्याचे थोतांड केलेले आवडत नाही. म्हणून आपण बरे, आपली श्रद्धा बरी असेच आजवर आहे. श्रद्धा ही खुपच पर्सनल बाब आहे. म्हणून मी मला जे योग्य वाटले माझ्या धर्मातले, ते निःसंकोच घेतले. काही पारखून घेतले. आणि मनापासून करते जे जे आवडलं ते, चुकत माकत…काही कर्तव्य म्हणून तर काही खूप मजा येते म्हणून! पुण्य किती मिळते व ते कसं मोजायचं हे मात्र अजून समजलं नाहीय्ये!!

जेंव्हा मी आई झाले, तेंव्हा मला माझ्या आईची हे सारं आम्हाला समजावून सांगायची तळमळ कळली. आता मीदेखील माझ्या छोटीला अकबर बिरबल, इसापनीती, राजा- राणी, याबरोबरच देवांच्या गोष्टी पण सांगते. कारण मला वाटत, आईनेच यासर्वाची ओळख करून द्यायची असते.

तसा आपल्या धर्माचा पसारा मोठा आहे. वर्षभर अखंड सर्व महिन्यांमध्ये काहीना काही सण, उपवास, इ. असतच. पण, माझा आपला श्रावण सगळ्यात आवडीचा! मुलींसाठी तर प्रचंड आनंद, उत्साह, करमणूक यांनी भरलेला असतो श्रावण महिना. विशेषतः सासुरवाशीणीन्साठी. छोट्या मुलींसाठी तर पर्वणीच…नवीन फ्रॉक, कपडे, बांगड्या, टिकल्या, मेहेंदी, कौतुक, सगळच येतं वाट्याला. पावसाने हिरवागार झालेला असतो निसर्ग आणि त्याबरोबरच देवाची ओढ लावणारी व्रते, त्या निमित्ताने होणाऱ्या भेटी – गाठी, दान- धर्म, उपवास, नेम- नियम, या सगळ्यात एक खूप आनंद आणि प्रसन्नपण भरलेले असते.

मी जशी लहानपणी आई आणि ताई बरोबर बसून श्रावण सुरु झाल्यापासून कहाण्या वाचायचे रोज वेगवेगळ्या, तशा माझ्या छोट्या लेकीला देखील सांगायला सुरुवात केली. पण ती पडली इंग्रजी माध्यमात शिकणारी…जुन्या पठडीचं मराठी तिला कळायचं नाही. म्हणून तिला त्याच कहाण्या सोप्प्या करून, वर्तमानाच्या संदर्भाने,  गोष्ट रूपात सांगितल्या. तिला त्या फारच आवडल्या. मग वाटलं, त्या सोप्या केलेल्या लिहून काढल्या तर?! मग तो प्रयत्न केला…आणि म्हटलं, चला त्या सगळ्यांबरोबर शेअर करू….पुण्य तसं पण वाटलेलं चांगलं असतं नाही का?! तर तुम्हाला आवडलं तर जरूर वाचा…तुमचा अभिप्रायही कळवा. हा श्रावण आपल्या सर्वांवर सुख- समाधानाची, प्रसन्नतेची  बरसात करूदे.

Published by

MyThinkingMug

Happy Soul ...who loves to connect & express

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s