आज आषाढ अमावस्या. यालाच दिव्याची अमावस्या असंही म्हणतात. आज घरातले सर्व दिवे/ दीपक स्वच्छ करून, त्यांची साग्रसंगीत पूजा केली जाते. नैवेद्य दाखवला जातो. त्याच बरोबर प्रार्थना केली जाते, की आयुष्यातील अंधार रुपक परिस्थिती नष्ट होवो. दिव्यांचे तेज आपल्या घरात, आयुष्यात सतत राहो. त्याच दिव्याच्या अमावस्येची एक कहाणी आहे, जी आज वाचली जाते, ती छोट्या गोष्टी –रूपात मी माझ्या लेकीला सांगते नेहेमी.
एक छानसं गाव होतं. त्या गावात राजा देखील होता. त्याच्या परिवारात एक सूनही होती. तिने एकदा घरातला पदार्थ स्वतः खाल्ला, पण कोणी रागावू नये म्हणून तिने उंदरांवर खोटा आळ घेतला. उंदरांना राग आला. त्यांनी या आळाबद्दल तिचा सूड घ्यायचं ठरवलं. त्यांनी तिची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणात नेवून टाकले. दुसरे दिवशी हिची पंचायीत झाली, फजिती झाली, आणि घरातील सर्वांनी तिला घरातून हाकलून दिले.
ही स्त्री, राजाची सून, खूप चांगली होती. रोज घरातील कामाबरोबरच, सर्व दिवे घासून पुसून त्यांची मनोभावे छान पूजा करायची. आषाढ अमावास्येच्या दिवशी त्यांना नैवेद्यही दाखवायची. पण या वर्षी ती घरी नसल्याने दिव्यांची पूजाही होत नव्हती आणि अमावस्येला देखील नाहीच झाली. त्या अमावास्येच्या दिवशी राजा शिकारी हून परत येत असताना रात्र झाल्याने जंगलातील झाडाखाली थांबला..तिथे त्याच्या कानावर काही आवाज आले. त्याने पाहिले की गावातील सर्वांच्या घरातील दिवे झाडावर जमले होते आणि कोणाकोणाच्या घरी कशी कशी पूजा झाली, काय काय नैवेद्य होता याची चर्चा करत होते. तिथे राजाच्या घरातील दिवे उदास पणे म्हणाले, “त्याची सून किती चांगली होती, आमची रोज पूजा करायची, अमावास्येला नैवेद्य दाखवायची. यंदा ती नाही, तर आमचा थाट तर सोडाच, पण आमची पूजाच झाली नाही.” इतर दिव्यांनी त्यांना याचं कारण विचारला असता त्यांनी तिची खरी कहाणी सांगितल आणि म्हणाले,”ती जिथे असेल तिथे सुखात असो”. ते ऐकून राजाला आपली चूक उमजली. त्याने घरी येवून, आपल्या घरच्यांना सर्व सांगितले व आपल्या सुनेला मानाने घरी परत आणले. तिची क्षमा मागितली.
माझ्या छोटीला दिवे बोलतात हे काही फारसं पटलं नाही. पण, आपल्या चुकीचा आळ दुसऱ्यावर टाकू नये, हे मात्र तिला समजलं. तिच्या भाषेत अमावस्येला दिव्यांचे पूजन हे ‘काइंड ऑफ थैंक्स गीविंग’ आहे!!
जसे दिव्यांच्या आशीर्वादाने गोष्टीतल्या राजाच्या सुनेच्या आयुष्यातील संकट टळले, सुख परत आले, तसे ते आपल्यालाही मिळो ही सदिच्छा!