मनसा ही कश्यप ऋषी आणि कद्रू यांची मुलगी. ती ब्रह्मदेवाची मानसपुत्री..म्हणून तिचे नाव मनसा असे पडले असावे. ती खूप विद्वान, तपस्वी होती. श्री महादेवाची शिष्या. तिने प्रचंड तप करून श्री विष्णूंची कृपा देखील मिळवली. ब्रह्मदेवांनी तिचा विवाह जातकरु ऋषींशी करून दिला. जाताकरुंची एकच अट होती की मनसेने त्यांची आज्ञा मोडायची नाही.
एकदा जातकरु ऋषी थकून दुपारी मनसेच्या मांडीवर डोके ठेवून पहुडले असता त्यांना खूप गाढ झोप लागली. संध्याकाळ झाली. त्यांची संध्या करायची वेळ टाळून जाऊ नये म्हणून मनसेने त्यांची झोप मोडली. ऋषी खूप रागावले..त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी चिडून तिला आपण एकत्र राहू शकत नाही असे सांगितले. तिने खूप गयावया केली, परंतु, ऋषींचा राग कमी होईना. मनसा आपल्या मानस पित्याकडे गेली. श्री ब्रह्मदेव, श्री महादेव, श्री विष्णू, सर्वांनी जातकरू ऋषींना समजावयाचा खूप प्रयत्न केला. पण, ते ऐकेनात. तेंव्हा देवानी त्यांना सांगितले, की कोणतेही लग्न स्त्रीला त्या लग्नापासून मातृत्व प्राप्त झाल्याशिवाय मोडता येणार नाही. तेंव्हा जातकरू ऋषींनी तिला मातृत्वाचे वरदान देवून तेथून ते निघून गेले.
गरोदर मनसेची पार्वती देवींनी काळजी घेतली. तिला पुत्ररत्न झाले. त्याचे नाव आस्तिक असे ठेवले. आस्तीकाने देखील ब्रह्मदेव आणि महादेवांकडून शिक्षण घेतले. त्याला त्याच्या वडिलांचा आशीर्वाद होता की तो मोठा पराक्रमी व त्यांच्या पेक्षा महान ऋषी होईल.
एकदा, जनमेजय राजाने सर्व सर्पांचा नाश करण्या साठी सर्पयागाचे आयोजन केले. जनमेजय हा परीक्षित राजाचा मुलगा. परीक्षिताला तक्ष नावाच्या सर्पाने दंश केल्यामुळे त्याचा मृत्यू झालं होता. त्याचाच सूड घेण्यासाठी जनमेजयाने हां यज्ञ करायचे ठरविले होते. या यज्ञाला सुरुवात झाली. त्यात सर्व सर्प आहुती पडले. परंतु, दक्षक मात्र आला नाही. राजाच्या सैनिकांनी माहिती आणली की दक्षकाला इंद्र देवाचे वरदान आहे व तो इंद्रासनाला वेटोळे घालून बसला आहे. जनमेजयाला राग आला. त्याने सर्व ऋषींना विनंती केली की असे मंत्रोच्चार करा की इंद्रसनासकट दक्षकाची आहुती पडावी. मंत्रोच्चाराच्या ताकदीने इंद्रासन जागचे हलले, व इंद्र, आणि दक्षकासकट यज्ञ स्थळी जाऊ लागले. इंद्राने व इतर देवांनी श्री ब्रह्मदेवाची प्रार्थना केली की इंद्रासन वाचवा. ब्रह्मदेवांनी मनसेची मदत घेण्यास सांगितले. मनसेने आपला पुत्र आस्तिक याला तो यज्ञ थांबवण्याची आज्ञा दिली. आस्तिकाने मोठ्या पराक्रमाने हा यज्ञ थांबवला. इंद्रदेव व त्यांचे इंद्रासन वाचले. इंद्रदेवानी मनसेचे आभार मानले. दक्षकाचे प्राण ही वाचले. त्याने तिला नागभगिनी असे संबोधले. तेंव्हापासून तिची आराधना नागाला प्रसन्न करून घेण्यासाठी करण्याची प्रथा पडली. काही ठिकाणी तिचा उल्लेख नागांची मानस बहिण असाही आहे.
नागचतुर्थी ची पूजा श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवशी केली जाते. मनसा देवीची प्रार्थना, नागाची पूजा, असे याचे स्वरूप असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप, इ. चा जास्त वावर असतो. त्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून ही पूजा केली जाते. भारताच्या विविध भौगोलिक भागांमध्ये या पूजेचे स्वरूप आणि कथा यात फरक आहे. परंतु, जिने नाग कुळाचा संहार थांबविला, तिची प्रार्थना केल्यास, नाग कुलापासून आपणास काही त्रास होणार नाही, ही यामागील श्रद्धा..