नागपंचमी एकदम लाडकी.. एकतर आईच्या माहेरी मुलींचं खूप कौतुक व्हायचं या सणाला; तेच ती आम्हाला देत आली. माझं लहानपण कोकणात गेलं. तिथे तर नागोबांची भेट पावसाळ्यात अनेकदा व्हायचीच. पूर येवून गेला की हमखास पुढे २-३ साप बागेत फिरताना दिसायचे. नाही तर घरात कुठेही कौलाच्या वळचणीला, घड्याळावर, अंगणात, असे अचानक दर्शन द्यायचे. त्यामुळे, फारच श्रद्धेने नागाची पूजा करायचे मी तर, की बाबा रे, रक्षण कर, भक्षण नको. त्याच वेळी कोल्हापूर जवळच्या बत्तीस शिराळा येथील नागपंचमीला साप खरोखरीच पुजण्याच्या फोटोसहित बातम्या पेपर मध्ये भरभरून यायच्या..थ्रील वाटायचं एकदम. पण, या सगळ्यापेक्षा मुलगी म्हणून नटण्या –मुरडण्याचे जे लाड होत, त्याचे अप्रूप जास्त होते. नवीन फ्रौक, बांगड्या, नेलपोलिश, असल्या गोष्टींचं त्या त्या वयानुसार आकर्षण होतं..आणि आई जे तम्बीटाचे खमंग लाडू करत असे, त्यासाठी वर्षभर जी वाट पाहत असू, ती शब्दात सांगूच नाही शकत. ते लाडू खास कर्नाटकातले, ते खायला आमच्याकडे बरेच जणांचे नंबर लागलेले असत.
माझ्या मुलीला पण तेच कौतुक आम्ही सगळे मिळून करतो. तिला काही आमच्या सारखे मुक्त वावरणारे साप पहायचे भाग्य नाही. ही पिढी सर्पोद्यानामध्ये, आणि डिस्कवरी चैनेल वरच पाहणार साप वगैरे! पण आम्ही तिच्यासाठी मातीचा नागोबा आणून पूजा करतो. एक वर्षी तर तिनेच बनवला क्ले चा नागोबा!!
तिने बालकुतूहलाने विचारलेच, “मम्मा, नागाची पूजा का करतात?” मी म्हणाले, “अगं, त्यांनी त्रास देवू नये म्हणून आपण त्यांना प्लीज करायचं..आणि प्रॉमिस पण करायचं की आम्ही पण तुम्हाला त्रास देणार नाही! त्याची पण एक स्टोरी आहे बर का!” गोष्ट म्हटलं की आवडीचा विषय…मी लहानपणापासून ऐकलेल्या नागपंचमीच्या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट तिला तिच्या भाषेत सांगितली.
एकदा एका गावात एक शेतकरी होता. त्याच मोठ्ठं शेत होतं. मोठ्ठा परिवार देखील होता. त्याच्या शेतामध्ये नागाचं वारूळ होतं.
श्रावण महिना आला तसं त्याच्या सुना नागपंचमी सणासाठी माहेरी, आजोळी, गेल्या. पण सगळ्यात धाकटी सून होती तिला माहेरचे कोणीच नव्हते म्हणून ती खूप दुःखी होती. तिने मनोमन प्रार्थना केली की नागोबा माझा नातेवाइक आहे. तो येईल आणि मला माहेरी नेईल. तिची प्रार्थना आणि दुःख पाहून श्री शेषनागाला तिची दया आली. त्याने मनुष्य रूप घेतले आणि तिच्या घरी आला. शेतकऱ्याला आश्चर्य वाटले की हा कोण? कुठून आला? त्याने सुनेला विचारले तर तिने सांगितले, की हा माझा मामा. शेतकऱ्याने तिला मामाबरोबर माहेरी पाठवलं. मनुष्य रूपात आलेल्या नाग देवाने तिला आपल्या वारुळातल्या घरी नेले; आणि त्याच्या बायको मुलांना तिची हकीकत सांगून सगळ्यांना ताकीद दिली की तिला कोणी चावू नये.
शेतकऱ्याची सून तिच्या या मामाच्या घरी मजेत रहात होती. एके दिवशी नागाची पत्नी जेंव्हा पिल्ले देवू लागली, तेंव्हा तिने आपल्या या भाचीला दिवा धरायला सांगितले. वळवळणारी पिल्ले पाहून तिला भीती वाटली व तिच्या हातून दिवा पिल्लांच्या शेपटीवर पडला. पिल्लांच्या शेपट्या भाजल्या. जरी नागीण रागावली तरी तिने मुलीला काही इजा केली नाही. पण तिने आपल्या नवऱ्याला सांगितले. नागोबा म्हणाला,”आपण तिला लवकरच तिच्या घरी पोहोचवू”. काही दिवसांनी नागोबाने पुन्हा मनुष्यरूप धारण केले, आणि मुलीला खूप खाऊ, मिठाई , दागदागिने, भेटवस्तू, इ. देवून प्रेमाने तिच्या सासरी पोहोचवले.
पुढे नागाची पिल्ले मोठी झाली. त्यांनी आपल्या आईला विचारले, “आई, आमची शेपटी कशी तुटली गं?”. तेंव्हा नागिणीने त्यांना त्यांच्या जन्माच्या वेळची दुर्घटना सांगितली. नागाच्या मुलांना खूप राग आला आणि ते त्या मुलीचा, म्हणजे शेतकऱ्याच्या सुनेचा सूड घेण्यासाठी म्हणून तिच्या घरी आले. नेमका तो नागपंचमीचा दिवस होता. तिने पुष्कळ वेळ मागील वर्षी प्रमाणे आपल्याला न्यायला आपले मामा- भाऊ येतील म्हणून खूप वाट पाहिली. पण कोणीच आलं नाही. मग तिने पाटावर नागोबाचे चित्र काढले. त्याची पूजा केली. त्याला दुध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला. नागाची पिल्ले हे सगळं लपून पाहत होती. त्यांचा राग ओसरला. त्यांना आपल्या या मानलेल्या बहिणीचं वाईट वाटलं. त्यांनी रात्री त्या पूजेच्या पाटाखाली एक मस्त नवरतन हार ठेवला आणि ते तिला काहीही इजा नं करता, मनातून आशीर्वाद देवून निघून गेले. दुसरे दिवशी तिने तो हार पाहिला आणि तिला खात्री पटली, की तिचे मामा- भाऊ येवून गेले. आणि तिला खूप आनंद झाला.
“मम्मा, मला पण सख्खा भाऊ नाही. मग मी नागोबाची पूजा केली तर तो मला पण नेइल का वारुळात? मला पण हार मिळेल का?”
“हाहा, वारुळात नाही नेणार, आणि हार पण नको सोनूले आपल्याला, पण जेंव्हा तुला आयुष्यात कधी अडचण येईल काही, त्यावेळी, असाच देवाने तुझ्या साठी कोणा सदगृहस्थाला तुझा भाऊ किंवा मामा म्हणून पाठवावं मदतीला ..”
“म्हणजे नागोबा आपला राखी ब्रदर?!” तिचा पुन्हा प्रश्न…म्हटलं, “हो राणी, आपल्याला भाऊ नसले तरी असेच राखी ब्रदर च धावून येतात गरजेला.”
गोष्टीतील शेतकऱ्याच्या सुनेला जसे नागोबा प्रसन्न झाले, तसे तुम्हा आम्हा पण होवोत!