श्रावण सोमवार खूप पवित्र दिवस. मस्त पाउस, हिरवळ, आणि शंकराच्या देवळात मनोभावे घेतलेले दर्शन. खरंच शंकराच्या पिंडीवरचा जलाभिषेक पाहून देखील मनःशांती मिळते. माझ्या लेकीला घेवून जवळच्या शंकराच्या देवळात गेलं, की तिला शंकराच्या पिंडी वर पांढऱ्या शुभ्र फुलांची आणि हिरव्यागार बेलाच्या पानांची सजावट पाहण्यात खूप मजा येते. काही दिवसापूर्वी आम्ही सगळे भोजपूरच्या प्रसिद्ध महादेव मंदिरात गेलो होतो. त्या मंदिराची भव्यता आठवली तरी अजूनही तिचे डोळे मोठ्ठे आणि तोंडाचा आ वासून म्हणते, “मम्मा, इतकी मोठी शंकराची पिंडी मी कुठ्ठेच पाहिली नाही अजून!”
तिला श्रावण सोमवारची ‘वाटीभर दुधाची गोष्ट’ पण तितकीच आवडते. तिच्या मते गोष्टीतली आजीबाई, जगातली बेस्ट आजी आहे!
तर एकदा काय झालं, एका मोठ्या नगरामध्ये एक राजा होता. तो खूप मोठा शिवभक्त होता. त्याने ठरवले, की आपल्या नगरातील शिवमंदिराचा गाभारा दुधाने भरायचा. मग कशाचा अवकाश, त्याने दवंडी पिटवली, की सगळ्यांनी घरी, असेल नसेल तितके सगळे दुध गाभार्यात आणून महादेवाच्या पिंडीवर वाहावे. त्याची प्रजा घाबरून गेली. सगळे दुध देवाला वाहिले, तर मुलाबाळांना, वासरांना काय पाजावे?? पण, राजाच्या आदेशापुढे सगळे झुकले. सर्व लोकांनी घरातील सगळे दुध आदेशाप्रमाणे महादेवाला वाहिले, पण आश्चर्य, गाभारा भरला नाही. त्याच गावात, एक म्हातारी आजी राहायची. तिने मात्र, या आदेशाला फारसे मानले नाही. तिने वासरू गायीपाशी सोडले, मुलांना दुध दिले, आणि मग दुपारी उरलेले वाटीभर दुध घेवून, फुले, बेलपान घेवून देवळात गेली. तिने मोठ्या श्रद्धेने महादेवाला हात जोडले. फुल, बेलपान वाहिले, आणि सोबत आणलेले वाटीभर दुध समाधानाने महादेवावर वाहिले. काय आश्चर्य?! इतका वेळ नं भरलेला गाभारा भरला! पुजारी पाहाताच राहिला. त्याने राजाकडे खबर पाठवली. राजा स्वतः पाहायला आला. गाभारा दुधाने भरला होता.
पुढे दोन-चार दिवस असेच झाले. म्हातारी आजी आपल्या घरचे वाटीभर दुध जोपर्यंत देवाला वाहात नाही, तोवर गाभारा भरत नसे. राजाला राहवेना. त्याने एक दिवस लपून हा सर्व प्रकार पाहिला. आजीचे हात धरले, आणि म्हणाला, “आजी, हा काय प्रकार आहे, सांगा”. म्हातारी आजी घाबरून गेली. राजा म्हणाला, “घाबरू नका, पण मला सांगा, की तुम्ही दुध वाहात नाही तोवर गाभारा भारत नाही, असे का?” आजी म्हणाली, “महाराज, तुमची आज्ञाच चुकीची होती. सगळं दुध देवाला वाहिलं, आणि राज्यातल्या सगळ्या मुलांचे, वासरांचे प्राण तळमळले. आयांचे, गायी- म्हन्शींची आपल्या लेकरांसाठी तळतळ झाली. देवाला हे कसे आवडेल? म्हणून गाभारा भरला नाही. म्हणून, मुला- वासरांना दुध पाजावे, घरी सगळ्यांनी आनंदाने राहावे, आणि मग पहा, प्रत्येकाने थोडेसे दुध वाहिले, तरी गाभारा भरेल.”
राजाला आपली चूक समजली. त्याने सर्वांची माफी मागितली आणि आपला आदेश मागे घेतला.
खरंच आहे नाही का, घरातल्या लहान मुलांना, पशुप्रान्यांना उपाशी ठेवून देव कधी प्रसन्न होईल का? नाहीच मुळी!
माझी लेक म्हणते, “मम्मा, सगळ्याच आज्या अशाच हुशार असतात. आपली आजी पण देवाला आणि मला एकदमच लाडू खायला देते. ती म्हणते,तू पण माझी देवी आहेसच की !”