एक आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण रहात होता. त्याला बायको, एक मुलगा आणि सून असं छोटंसं कुटुंब होत. मुलगा लांबच्या प्रवासाला गेला होता. ब्राह्मण गरीब होता. तो व त्याची बायको भिक्षा मागून धान्य आणत. सून घरातली कामे करून, स्वैपाक करून त्यांची वाट पाहत असे. सासू सासरे आले, ती तिघे मिळून जेवत.
श्रावण महिना सुरु झाला. शनिवारी नेहेमी प्रमाणे ब्राह्मण व त्याची बायको देवदर्शनाला गेले. इकडे घरी एक मुलगा आलं. आणि सुनेला म्हणाला, “बाई, मला स्नान करायचे आहे. मला तेलपाणी दे.” सून म्हणाली,”आमच्या घरात तेल नाही. तुला काय देवू?”
तो मुलगा म्हणाला,”माझ्या पुरतं तेल असेल. ते दे. मला भूकही लागली आहे. जेवायला दे.” तिने पाहिलं, तर बाटलीत तळाशी थोडसं तेल होतं. ते त्याला दिलं. अंघोळीला गरम पाणी दिलं. जे काही होतं, त्याचा स्वैपाक करून जेवायला वाढला. तो मुलगा निघून गेला. सासू सासरे परत आल्यावर त्यांच्याबरोबर आपण जेवली.
तो मुलगा असं चारही शनिवार आला. ब्राह्मणाच्या सुनेने चारी शनिवार त्याला जेवू घातलं. जाताना त्याने तांदूळ मागितले, व तो घरभर तांदुळाचे दाणे फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा मोठा वाडा झाला. गोठ्यामध्ये गुरे ढोरे आली. नोकर चाकर आले. सासू सासरे देवळातून परत आले, पण त्यांना आपले घर सापडेना. आपल्या घराच्या जागी वाडा कुणाचा म्हणून विचार करत बाहेर उभे होते. सून बाहेर आली. तिने सर्व प्रकार सांगितला. ब्राह्मणाने तिला म्हंटले,” मुली श्री हनुमंताने तुला दर्शन दिले, व आशीर्वाद दिला. ही सारी त्याचीच कृपा.”
जसा मारुतीराया त्यांना प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवो.
माझ्या छोटीला ही सुद्धा गोष्ट खूप आवडते. पण तिचे या कालानुरूप निरागस प्रश्नही असतात. “आई, पण तूच म्हणतेस ना, की ओळखीचा माणूस नसेल तर त्याला घरात घेऊ नये, मग ?” मी अवाक. कारण, माझ्या आईने ही गोष्ट सांगितली, तर निमूट ऐकण्यापलीकडे मी काही केलं नाही. हा प्रश्न मला पडलाच नाही. तो काळही वेगळा होता. मी म्हटलं,” बरोबर सोना, आत्ता काळ वेगळा आहे. कोणा अनोळखी माणसाला घरात घेणे थोडे धोक्याचे. पण, देव कधी कोणत्या रूपात येइल आपली परीक्षा घ्यायला काही सांगता येत नाही.” “म्हणजे देव आपली परीक्षा घेतो का?” म्हटलं,”घेतो कधी कधी. पाहतो, तुम्ही दुसऱ्यांना मदत करता का? तुम्ही चांगले वागत असाल, तर तो तुम्हाला मदत करतो. आशीर्वाद देतो.” तिला हे पटलं.
गोष्टी प्रमाणे, कदाचित आपण आज कोणाला घरात घेवून अंघोळ घालू का मलादेखील माहीत नाही. पण, थोडा विचार करा…मुंबई, चेन्नई, गुरुग्राम आणि कुठे कुठे पूर आले, भूकंप झाले, आपल्यातल्या शेकडोंनी हजारो अनोळखींना मदत केली. आपल्या घरात देखील आसरा दिला. आपल्या घासातला घास दिला, अंथरूण पांघरूण दिले..बदल्यात गरजूंनी अनमोल अशा सदिच्छा आणि आशीर्वाद दिले!! तेच तर महत्वाचे आहेत आपल्या साठी. आपले भले होण्यासाठी. नाही का?!
मस्तच
LikeLike