पूर्वी मोठी घरं असायची, त्यात आताच्या पिढीला खरं वाटणार नाही अशा जादुई खोल्या असायच्या. कोठीची खोली, बाळंतिणीची खोली, तशीच एक अडगळीची खोली पण असायची. माझ्या आजोळी आम्हा मुलांना सुट्टीत खेळून कंटाळा आला की यापैकी एका जादुई खोलीत जायचो आणि पुढे 2-3 तास कसे निघून जायचे कळायचं नाही. अडगळीच्या खोलीत इतक्या नाविन्यपूर्ण वस्तू दिसायच्या कि नुसते पाहत बसायचो. त्याला मोठे लोक अडगळ का म्हणतात याचे नवल वाटायचे!
बागकामाची हत्यारं, अडकित्ते, पकडी, खिळे मोळे, जुने रंगाचे डबे, नीट बांधून ठेवलेली रद्दी, विविध आकारातले रंगाचे ब्रश, झाडू, बाटल्या, हिंगाचे डबे (ते मला खूप आवडायचे, लक्ष्मीचं चित्र असलेले), बिस्किटाचे रिकामे डबे, काही न काही. आम्ही गुपचूप दार बंद करून ते उचकुन पाहायचा उद्योग करायचो. दिवाळीच्या आधी आजी नेहेमी ती खोली पण साफ करून घ्यायची, नको ते भंगारवाल्याला द्यायची; त्यात तिला मदत करायला पण आवडायचं. जुन्या वस्तूंच्या काय काय आठवणी सांगत राहायची आजी, हे अमुक ने दिलेलं, ते तुझा मामा लहान असताना घेतलेलं, हा तुझ्या आईचा पाळणा, इ. त्या आठवणी सांगताना ती भूतकाळात चक्कर मारून यायची ते तिच्या डोळ्यात पाहायला खूप आवडायचं.
मग टाकू टाकू म्हणत पुन्हा ठेवल्या जायच्या काही वस्तू आणि तरी 2/4 वस्तूंची गच्छन्ती निश्चित व्हायची. भंगारवाला कधी येतो त्यावर नजर ठेवणे हे पण मोठं महत्वाचं काम आहे असं वाटायचं, आणि तिचं मोलभाव करणं सुद्धा मनापासून पाहत बसायचे मी.
आता दिवाळीच्या निमित्ताने सफाई करताना विशेष काम पडत नाही, कारण घरं लहान असल्याने नेहेमी साफ सफाई करत राहायची सवय. पण, मन आजही त्या अडगळीच्या खोलीत जातं.
मनात सुद्धा अशीच एक अडगळीची खोली असते, नको असलेले तिकडे कोंबत असतो आपण आणि वेळ मिळेल तेंव्हा डोकावतो तिथे सफाईच्या नावाखाली. कितीतरी आठवणी टाकून द्याव्या म्हणून उचलून पुन्हा ठेवतो…इतकं सोपं नसतं ना काडी काडी जमवलेलं टाकून देणं..मग पुन्हा आठवणींची संदुक बंद करून उठायचं, खोली बंद करून दिवाळीकड़े हसून पहायचं!

मृणाल काशीकर- खडक्कर