शुक्रवारची गोष्ट .

एक नगर होतं. तिथे एक गरीब माणूस राहत असे. त्याच्या पत्नीला तिच्या शेजारणीने गरिबी दूर होण्यासाठी श्रावण शुक्रवार पासून श्री लक्ष्मी ची आराधना कर असे सांगितले. दिवसभर उपवास कर, संध्याकाळी सवाष्णीला बोलाव, तिचे पाय धू, ओटी भर. हळदी- कुंकू दे, साखर घालून दुध प्यायला दे, भाजलेल्या हरभऱ्यांची खिरापत दे आणि मग तू उपवास सोड. असं वर्षभर कर आणि नंतर य व्रताचे उद्यापन कर. तिने घरी आल्यावर देवाची प्रार्थना केली, आणि ती देवाची आराधना करू लागली.

त्याच गावात तिचा भाऊ राहत असे. तो श्रीमंत होता. त्याने गावभोजनाचा, सहस्त्राभोजनाचा कार्यक्रम सुरु केला. पण, आपल्या गरीब बहिणीला बोलावलं नाही. परंतु, गावातील सर्व लोक जाताना पाहून हिला आपल्या मुलांचा हट्ट मोडवला नाही. आणि ती आपल्या मुलांसोबत आमंत्रण नसताना जावून पंक्तीत बसली. भावाने तिला बोलावले नव्हते, कारण त्याला वाटले ही आपली बहिण आहे हे लोकांना कळेल तर आपल्याला हसतील. तो म्हणाला, “ताई, तू आज आलीस, पण पुन्हा येऊ नकोस.” तिला फार ओशाळल्यागत झाले. ती जेवून मुलांना घेवून घरी आली. मुलांनी पुन्हा दुसरे दिवशी हट्ट केला. तिला वाटले, रागावला तरी भूच आहे. मुलांना चांगलं जेवायला मिळेल. म्हणून ती दुसरे दिवशी मुलाना घेवून भावाच्या घरी गेली. भावाने पंक्तीत तूप वाढताना तिला पाहिले, आणि तो म्हणाला, “भिकारडी ती भिकारडी, पुन्हा पुन्हा येऊ नको म्हटलं तरी येतेस. उद्या आलीस तर हाकलून घालवून देईन.” तिने तरी भावाचा राग मानला नाही. तिसरे दिवशी मात्र तिला भावाने हाताला धरून घालवून दिले. ती फार दुःखी झाली. देवाची प्रार्थना केली. पूर्ण दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस येऊ लागले.

वर्ष जाताजाता, तिचे दिवसही पालटले. पुढे एके दिवशी ती तिच्या व्रताचे उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावलं. त्याला ओशाळायला झालं. तो म्हणाला,” ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. नाही म्हणू नकोस. उद्या तू आली नाहीस, तर मी तुझ्या घरी येणार नाही.” तिने येते म्हंटलं. भावाचा हेतू कळला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून, छान आवरून, दाग –दागिने घालून, उंची पैठणी नेसून भावाकडे गेली. भाऊ वाटच पाहत होता. ताई आली तशी त्याने हाताला धरून पाटावर बसवलं. पाय धुवायला गरम पाणी दिलं. जेवायची पाने वाढली. तिचं पान आपल्या शेजारी वाढलं.

भाऊ जेवायला बसला. ताईने आपली शालजोडी काढून बसल्या पाटावर ठेवली. भावाला वाटला, उकडत असेल म्हणून काढले असेल. नंतर तिने एक एक करून आपले सर्व दागिने काढून ठेवले. आणि जेवणाचा एक एक घास ती त्या दागिन्यांवर ठेवू लागली. भावाने विचारले, “ताई, तू हे काय करतेस? तू जेव ना.” तिने सांगितलं, “ अरे, हे माझं जेवण नाही. या लक्ष्मीचं जेवण आहे. जे मी चुकून सहस्त्राभोजनाच्या दिवशी जेवले.” हे ऐकून भावाला आपली चूक समजली. त्याने उठून तिचे पाय धरले. आणि क्षमा मागितली. बहिणीने भावाला क्षमा केली, आणि दोघांनी देवीचे आभार मानले. नंतर भाऊ तिच्याकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीने तिला जसा समर्थ करून आनंदी केलं, तसा तुम्हा आम्हा करो.

माझ्या छोटीला ही कहाणी मी गोष्ट म्हणून सुद्धा सांगायचे. तिला ही गोष्ट  खूप आवडते. आणि ती मन लावून ऐकते. आपल्यापेक्षा कमी असलेल्यांना कमी लेखू नये हे तात्पर्य तिला समजले पाहिजे हाच माझा अट्टाहास !

आपणही कधी ना कधी अशा प्रसंगाला सामोरे गेलेलो असू, जेंव्हा आपल्या पेक्षा अधिक चांगल्या सांपत्तिक स्थिती मधील नातेवायिक किंवा मित्र मंडळीनी आपल्याला त्यांच्या एखाद्या कार्यक्रमात, पार्टीत,  सोयीस्कररित्या याच कारणाने  वगळलेलं असतं. कारण, कधी कधी सन्मान हे आपल्या सांपत्तिक स्थिती मुळेच येतात. मलादेखील असे अनेक अनुभव आले. आपण वाईट वाटून नं घेता, आपले चांगले कर्म करत राहायचे, देवाची कृपा होतेच…कारण, प्रत्येकाचे चांगले दिवस येतात. आपल्या चांगल्या दिवसात कोणाला कमी लेखू नका…आणि वाईट दिवसात ज्यांनी साथ दिली त्यांना विसरू नका. चांगल्या दिवसांमध्ये कोणी मानसन्मान दिला तर तो त्या लक्ष्मी मुळे आला आहे, याची जाण ठेवा, म्हणजे झालं.

Published by

MyThinkingMug

Happy Soul ...who loves to connect & express

2 thoughts on “शुक्रवारची गोष्ट .”

Leave a comment