शनिवारची गोष्ट.

एक आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण रहात होता. त्याला बायको, एक मुलगा आणि सून असं छोटंसं कुटुंब होत. मुलगा लांबच्या प्रवासाला गेला होता. ब्राह्मण गरीब होता. तो व त्याची बायको भिक्षा मागून धान्य आणत. सून घरातली कामे करून, स्वैपाक करून त्यांची वाट पाहत असे. सासू सासरे आले, ती तिघे मिळून जेवत.

श्रावण महिना सुरु झाला. शनिवारी नेहेमी प्रमाणे ब्राह्मण व त्याची बायको देवदर्शनाला गेले. इकडे घरी एक मुलगा आलं. आणि सुनेला म्हणाला, “बाई, मला स्नान करायचे आहे. मला तेलपाणी दे.” सून म्हणाली,”आमच्या घरात तेल नाही. तुला काय देवू?”

तो मुलगा म्हणाला,”माझ्या पुरतं तेल असेल. ते दे. मला भूकही लागली आहे. जेवायला दे.” तिने पाहिलं, तर बाटलीत तळाशी थोडसं तेल होतं. ते त्याला दिलं. अंघोळीला गरम पाणी दिलं. जे काही होतं, त्याचा स्वैपाक करून जेवायला वाढला. तो मुलगा निघून गेला. सासू सासरे परत आल्यावर त्यांच्याबरोबर आपण जेवली.

तो मुलगा असं चारही शनिवार आला. ब्राह्मणाच्या सुनेने चारी शनिवार त्याला जेवू घातलं. जाताना त्याने तांदूळ मागितले, व तो घरभर तांदुळाचे दाणे फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा मोठा वाडा झाला. गोठ्यामध्ये गुरे ढोरे आली. नोकर चाकर आले. सासू सासरे देवळातून परत आले, पण त्यांना आपले घर सापडेना. आपल्या घराच्या जागी वाडा कुणाचा म्हणून विचार करत बाहेर उभे होते. सून बाहेर आली. तिने सर्व प्रकार सांगितला. ब्राह्मणाने तिला म्हंटले,” मुली श्री हनुमंताने तुला दर्शन दिले, व आशीर्वाद दिला. ही सारी त्याचीच कृपा.”

जसा मारुतीराया त्यांना प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवो.

माझ्या छोटीला ही सुद्धा गोष्ट खूप आवडते. पण तिचे या कालानुरूप निरागस प्रश्नही असतात. “आई, पण तूच म्हणतेस ना, की ओळखीचा माणूस नसेल तर त्याला घरात घेऊ नये, मग ?” मी अवाक. कारण, माझ्या आईने ही गोष्ट सांगितली, तर निमूट ऐकण्यापलीकडे मी काही केलं नाही. हा प्रश्न मला पडलाच नाही. तो काळही वेगळा होता. मी म्हटलं,” बरोबर सोना, आत्ता काळ वेगळा आहे. कोणा अनोळखी माणसाला घरात घेणे थोडे धोक्याचे. पण, देव कधी कोणत्या रूपात येइल आपली परीक्षा घ्यायला काही सांगता येत नाही.” “म्हणजे देव आपली परीक्षा घेतो का?” म्हटलं,”घेतो कधी कधी. पाहतो, तुम्ही दुसऱ्यांना मदत करता का? तुम्ही चांगले वागत असाल, तर तो तुम्हाला मदत करतो. आशीर्वाद देतो.” तिला हे पटलं.

गोष्टी प्रमाणे, कदाचित आपण आज कोणाला घरात घेवून अंघोळ घालू का मलादेखील माहीत नाही. पण, थोडा विचार करा…मुंबई, चेन्नई, गुरुग्राम आणि कुठे कुठे पूर आले, भूकंप झाले, आपल्यातल्या शेकडोंनी हजारो अनोळखींना मदत केली. आपल्या घरात देखील आसरा दिला. आपल्या घासातला घास दिला, अंथरूण पांघरूण दिले..बदल्यात गरजूंनी अनमोल अशा सदिच्छा आणि आशीर्वाद दिले!! तेच तर महत्वाचे आहेत आपल्या साठी. आपले भले होण्यासाठी. नाही का?!

अडगळीची खोली

पूर्वी मोठी घरं असायची, त्यात आताच्या पिढीला खरं वाटणार नाही अशा जादुई खोल्या असायच्या. कोठीची खोली, बाळंतिणीची खोली, तशीच एक अडगळीची खोली पण असायची. माझ्या आजोळी आम्हा मुलांना सुट्टीत खेळून कंटाळा आला की यापैकी एका जादुई खोलीत जायचो आणि पुढे 2-3 तास कसे निघून जायचे कळायचं नाही. अडगळीच्या खोलीत इतक्या नाविन्यपूर्ण वस्तू दिसायच्या कि नुसते पाहत बसायचो. त्याला मोठे लोक अडगळ का म्हणतात याचे नवल वाटायचे!

बागकामाची हत्यारं, अडकित्ते, पकडी, खिळे मोळे, जुने रंगाचे डबे, नीट बांधून ठेवलेली रद्दी, विविध आकारातले रंगाचे ब्रश, झाडू, बाटल्या, हिंगाचे डबे (ते मला खूप आवडायचे, लक्ष्मीचं चित्र असलेले), बिस्किटाचे रिकामे डबे, काही न काही. आम्ही गुपचूप दार बंद करून ते उचकुन पाहायचा उद्योग करायचो. दिवाळीच्या आधी आजी नेहेमी ती खोली पण साफ करून घ्यायची, नको ते भंगारवाल्याला द्यायची; त्यात तिला मदत करायला पण आवडायचं. जुन्या वस्तूंच्या काय काय आठवणी सांगत राहायची आजी, हे अमुक ने दिलेलं, ते तुझा मामा लहान असताना घेतलेलं, हा तुझ्या आईचा पाळणा, इ. त्या आठवणी सांगताना ती भूतकाळात चक्कर मारून यायची ते तिच्या डोळ्यात पाहायला खूप आवडायचं.
मग टाकू टाकू म्हणत पुन्हा ठेवल्या जायच्या काही वस्तू आणि तरी 2/4 वस्तूंची गच्छन्ती निश्चित व्हायची. भंगारवाला कधी येतो त्यावर नजर ठेवणे हे पण मोठं महत्वाचं काम आहे असं वाटायचं, आणि तिचं मोलभाव करणं सुद्धा मनापासून पाहत बसायचे मी.

आता दिवाळीच्या निमित्ताने सफाई करताना विशेष काम पडत नाही, कारण घरं लहान असल्याने नेहेमी साफ सफाई करत राहायची सवय. पण, मन आजही त्या अडगळीच्या खोलीत जातं.

मनात सुद्धा अशीच एक अडगळीची खोली असते, नको असलेले तिकडे कोंबत असतो आपण आणि वेळ मिळेल तेंव्हा डोकावतो तिथे सफाईच्या नावाखाली. कितीतरी आठवणी टाकून द्याव्या म्हणून उचलून पुन्हा ठेवतो…इतकं सोपं नसतं ना काडी काडी जमवलेलं टाकून देणं..मग पुन्हा आठवणींची संदुक बंद करून उठायचं, खोली बंद करून दिवाळीकड़े हसून पहायचं!

मृणाल काशीकर- खडक्कर

शुक्रवारची गोष्ट .

एक नगर होतं. तिथे एक गरीब माणूस राहत असे. त्याच्या पत्नीला तिच्या शेजारणीने गरिबी दूर होण्यासाठी श्रावण शुक्रवार पासून श्री लक्ष्मी ची आराधना कर असे सांगितले. दिवसभर उपवास कर, संध्याकाळी सवाष्णीला बोलाव, तिचे पाय धू, ओटी भर. हळदी- कुंकू दे, साखर घालून दुध प्यायला दे, भाजलेल्या हरभऱ्यांची खिरापत दे आणि मग तू उपवास सोड. असं वर्षभर कर आणि नंतर य व्रताचे उद्यापन कर. तिने घरी आल्यावर देवाची प्रार्थना केली, आणि ती देवाची आराधना करू लागली.

त्याच गावात तिचा भाऊ राहत असे. तो श्रीमंत होता. त्याने गावभोजनाचा, सहस्त्राभोजनाचा कार्यक्रम सुरु केला. पण, आपल्या गरीब बहिणीला बोलावलं नाही. परंतु, गावातील सर्व लोक जाताना पाहून हिला आपल्या मुलांचा हट्ट मोडवला नाही. आणि ती आपल्या मुलांसोबत आमंत्रण नसताना जावून पंक्तीत बसली. भावाने तिला बोलावले नव्हते, कारण त्याला वाटले ही आपली बहिण आहे हे लोकांना कळेल तर आपल्याला हसतील. तो म्हणाला, “ताई, तू आज आलीस, पण पुन्हा येऊ नकोस.” तिला फार ओशाळल्यागत झाले. ती जेवून मुलांना घेवून घरी आली. मुलांनी पुन्हा दुसरे दिवशी हट्ट केला. तिला वाटले, रागावला तरी भूच आहे. मुलांना चांगलं जेवायला मिळेल. म्हणून ती दुसरे दिवशी मुलाना घेवून भावाच्या घरी गेली. भावाने पंक्तीत तूप वाढताना तिला पाहिले, आणि तो म्हणाला, “भिकारडी ती भिकारडी, पुन्हा पुन्हा येऊ नको म्हटलं तरी येतेस. उद्या आलीस तर हाकलून घालवून देईन.” तिने तरी भावाचा राग मानला नाही. तिसरे दिवशी मात्र तिला भावाने हाताला धरून घालवून दिले. ती फार दुःखी झाली. देवाची प्रार्थना केली. पूर्ण दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस येऊ लागले.

वर्ष जाताजाता, तिचे दिवसही पालटले. पुढे एके दिवशी ती तिच्या व्रताचे उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावलं. त्याला ओशाळायला झालं. तो म्हणाला,” ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. नाही म्हणू नकोस. उद्या तू आली नाहीस, तर मी तुझ्या घरी येणार नाही.” तिने येते म्हंटलं. भावाचा हेतू कळला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून, छान आवरून, दाग –दागिने घालून, उंची पैठणी नेसून भावाकडे गेली. भाऊ वाटच पाहत होता. ताई आली तशी त्याने हाताला धरून पाटावर बसवलं. पाय धुवायला गरम पाणी दिलं. जेवायची पाने वाढली. तिचं पान आपल्या शेजारी वाढलं.

भाऊ जेवायला बसला. ताईने आपली शालजोडी काढून बसल्या पाटावर ठेवली. भावाला वाटला, उकडत असेल म्हणून काढले असेल. नंतर तिने एक एक करून आपले सर्व दागिने काढून ठेवले. आणि जेवणाचा एक एक घास ती त्या दागिन्यांवर ठेवू लागली. भावाने विचारले, “ताई, तू हे काय करतेस? तू जेव ना.” तिने सांगितलं, “ अरे, हे माझं जेवण नाही. या लक्ष्मीचं जेवण आहे. जे मी चुकून सहस्त्राभोजनाच्या दिवशी जेवले.” हे ऐकून भावाला आपली चूक समजली. त्याने उठून तिचे पाय धरले. आणि क्षमा मागितली. बहिणीने भावाला क्षमा केली, आणि दोघांनी देवीचे आभार मानले. नंतर भाऊ तिच्याकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीने तिला जसा समर्थ करून आनंदी केलं, तसा तुम्हा आम्हा करो.

माझ्या छोटीला ही कहाणी मी गोष्ट म्हणून सुद्धा सांगायचे. तिला ही गोष्ट  खूप आवडते. आणि ती मन लावून ऐकते. आपल्यापेक्षा कमी असलेल्यांना कमी लेखू नये हे तात्पर्य तिला समजले पाहिजे हाच माझा अट्टाहास !

आपणही कधी ना कधी अशा प्रसंगाला सामोरे गेलेलो असू, जेंव्हा आपल्या पेक्षा अधिक चांगल्या सांपत्तिक स्थिती मधील नातेवायिक किंवा मित्र मंडळीनी आपल्याला त्यांच्या एखाद्या कार्यक्रमात, पार्टीत,  सोयीस्कररित्या याच कारणाने  वगळलेलं असतं. कारण, कधी कधी सन्मान हे आपल्या सांपत्तिक स्थिती मुळेच येतात. मलादेखील असे अनेक अनुभव आले. आपण वाईट वाटून नं घेता, आपले चांगले कर्म करत राहायचे, देवाची कृपा होतेच…कारण, प्रत्येकाचे चांगले दिवस येतात. आपल्या चांगल्या दिवसात कोणाला कमी लेखू नका…आणि वाईट दिवसात ज्यांनी साथ दिली त्यांना विसरू नका. चांगल्या दिवसांमध्ये कोणी मानसन्मान दिला तर तो त्या लक्ष्मी मुळे आला आहे, याची जाण ठेवा, म्हणजे झालं.

बुधबृहस्पतीची गोष्ट.

बुध हा बृहस्पतीचा मुलगा. व्यापाऱ्यांचा देव व  त्यांचे रक्षण करणारा. त्याचा वार बुधवार असे मानतात. त्याला व बृहस्पती देवाला प्रसन्न करून घेण्याबद्दलची श्रावणात सांगितली जाणारी एक गोष्ट..

एका नगरात एक श्रीमंत माणूस राहात होता. त्याला सात मुलगे होते व सात सुनाही होत्या, असं मोठ्ठं कुटुंब होतं. त्यांच्या कडे रोज एक मामा-भाचे भिक्षा मागण्यास जात असत. त्याच्या सुना आमचे हात भिक्षा घालण्यास रिकामे नाहीत म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस झाल्यावर त्यांच्या घरी दारिद्र्य आलं. सर्वांचे हात खरंच रिकामे झाले. मामा- भाचे पुन्हा भिक्षा मागण्यास आले तेंव्हा सुनांनी सांगितलं, असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले. सर्वात धाकटी सून थोडी विचारी आणि शहाणी होती. तिने विचार केला, की जेंव्हा होतं तेंव्हा दिलं नाही. आता नाही म्हणून भिक्षेकरी विन्मुख जातात. तिने मामा- भाचे यांच्या पाया पडून त्यांची माफी मागितली. आणि पुन्हा पूर्वीसारखे ऐश्वर्य यावे यासाठी उपाय सांगण्याची विनंती केली.

त्यांनी सांगितले, श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी (गुरुवारी) एका भुकेल्या माणसाला जेवू घाल. तुला जे पाहीजे असेल त्याची मनापासून इच्छा कर, पाहुण्यांच्याशी चांगलं वाग..त्यांचा सन्मान कर. म्हणजे इच्छित गोष्टी  पूर्ण होतील.  त्याप्रमाणे धाकटी सून करू लागली.

एके दिवशी तिला स्वप्नं पडलं की तिच्या घरी जेवणावळ आहे, आणि चांदीच्या भांड्यातून तूप वाढते आहे. हे तर त्यांचे वैभव परत आल्याचे लक्षण..तिने खूप आनंदाने आपले स्वप्न जावांना सांगितल्यावर त्या हसू लागल्या. तिची थट्टा केली. पण त्यावेळी एक चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराच्या राजाचा मृत्यू झाला. दुसऱ्या राजाला गादीवर बसवल्याशिवाय अंत्यसंस्कार करायचे नाहीत म्हणून तेथील लोकांनी एका हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली वर तिला नगरात फिरवले. ज्याच्या गळ्यात ती माळ घालेल, त्याला राज्याभिषेक होयील अशी दवंडी पिटवली. हत्तीणीने नेमकी हिच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली. पण याचा दरिद्री अवतार पाहून राजवाड्यातील मंडळीनी त्याला हाकलून लावले. पुन्हा हत्तीणीला फिरवले. तिने पुन्हा याच्याच गळ्यात माळ घातली. असे दोनदा झाल्यावर मात्र यालाच राज्याभिषेक करून राजाच्या गादीवर बसवले. त्याने आपल्या घरच्यांची चौकशी करवली असता आता ते अन्न-धान्याची कमतरता होवून देशोधडीला लागल्याचे समजले.

राजाने एका मोठ्या तलावाचे काम सुरु केले. तिथे रोजगारासाठी हजारो मजूर खपू लागले. त्यात त्याच्या घरातील लोक सुद्धा होते. त्याने आपली पत्नी ओळखली, आणि त्याला आनंद झाला. तिने त्याला तिला पडलेल्या स्वप्नाची हकीकत सांगितली. देवाने देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजाने तिचे स्वप्न लक्षात ठेवून, गाव – भोजनाचा कार्यक्रम ठेवला आणि वाढण्यासाठी तिच्या हातात चांदीच्या भांड्यात तूप दिले. लोक जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं. राजाने त्यांचाही सन्मान केला. त्यांचा परिवार वाढला. मुलं बाळ झाली. दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस परत आले. तिला जसे बुधबृहस्पती प्रसन्न झाले, तसे तुम्हा आम्हा होवोत!

टीप : आपण आज बुधबृहस्पतीच्या मूळ कथेप्रमाणे पूजा अर्चा करणार नाही.  परंतु, आपल्या घासातला एक घास कोण गरजूला नक्कीच देवू शकतो. आपल्या कडे असताना ‘नाही आहे’ म्हणणे हे मनाचे दारिद्य नव्हे का? आपल्याकडे असताना नाही म्हणणे यामुळे कदाचित आपल्याकडे जे आहे ते नाहीसे होऊ शकते. अर्थात, ती वेळ कोणावरच नं येवो.

गोष्टीमधील स्त्रीच्या नवऱ्याच्या गोष्टी बद्दल म्हणाल, तर आज हीच परिस्थिती आहे. एकादे पद रिकामे झाले, की आंधळे पणाने नवीन व्यक्ती शोधून जागा भरण्यात येते. मग ती व्यक्ती आपल्या जिवलगांना / नातेवाइकांना कोणत्या तरी सरकारी योजनेमार्फत काम मिळवून देते..एकूण काय, सर्वांचे भलेच होते!!

आपण या गोष्टी मुळे एक व्रत नक्कीच घेऊ शकतो…आपल्या घासातला घास गरजूला द्यायला नाही म्हणूया नको!

वाटीभर दुधाची गोष्ट!

श्रावण सोमवार खूप पवित्र दिवस. मस्त पाउस, हिरवळ, आणि शंकराच्या देवळात मनोभावे घेतलेले दर्शन. खरंच शंकराच्या पिंडीवरचा जलाभिषेक पाहून देखील मनःशांती मिळते. माझ्या लेकीला घेवून जवळच्या शंकराच्या देवळात गेलं, की तिला शंकराच्या पिंडी वर पांढऱ्या शुभ्र फुलांची आणि हिरव्यागार बेलाच्या पानांची सजावट पाहण्यात खूप मजा येते. काही दिवसापूर्वी आम्ही सगळे भोजपूरच्या प्रसिद्ध महादेव मंदिरात गेलो होतो. त्या मंदिराची भव्यता आठवली तरी अजूनही तिचे डोळे मोठ्ठे आणि तोंडाचा आ वासून म्हणते, “मम्मा, इतकी मोठी शंकराची पिंडी मी कुठ्ठेच पाहिली नाही अजून!”

तिला श्रावण सोमवारची ‘वाटीभर दुधाची गोष्ट’ पण तितकीच आवडते. तिच्या मते गोष्टीतली आजीबाई, जगातली बेस्ट आजी आहे!

तर एकदा काय झालं, एका मोठ्या नगरामध्ये एक राजा होता. तो खूप मोठा शिवभक्त होता. त्याने ठरवले, की आपल्या नगरातील शिवमंदिराचा गाभारा दुधाने भरायचा. मग कशाचा अवकाश, त्याने दवंडी पिटवली, की सगळ्यांनी घरी, असेल नसेल तितके सगळे दुध गाभार्यात आणून महादेवाच्या पिंडीवर वाहावे. त्याची प्रजा घाबरून गेली. सगळे दुध देवाला वाहिले, तर मुलाबाळांना, वासरांना काय पाजावे?? पण, राजाच्या आदेशापुढे सगळे झुकले. सर्व लोकांनी घरातील सगळे दुध आदेशाप्रमाणे महादेवाला वाहिले, पण आश्चर्य, गाभारा भरला नाही. त्याच गावात, एक म्हातारी आजी राहायची. तिने मात्र, या आदेशाला फारसे मानले नाही. तिने वासरू गायीपाशी सोडले, मुलांना दुध दिले, आणि मग दुपारी उरलेले वाटीभर दुध घेवून, फुले, बेलपान घेवून देवळात गेली. तिने मोठ्या श्रद्धेने महादेवाला हात जोडले. फुल, बेलपान वाहिले, आणि सोबत आणलेले वाटीभर दुध समाधानाने महादेवावर वाहिले. काय आश्चर्य?! इतका वेळ नं भरलेला गाभारा भरला! पुजारी पाहाताच राहिला. त्याने राजाकडे खबर पाठवली. राजा स्वतः पाहायला आला. गाभारा दुधाने भरला होता.

पुढे दोन-चार दिवस असेच झाले. म्हातारी आजी आपल्या घरचे वाटीभर दुध जोपर्यंत देवाला वाहात नाही, तोवर गाभारा भरत नसे. राजाला राहवेना. त्याने एक दिवस लपून हा सर्व प्रकार पाहिला. आजीचे हात धरले, आणि म्हणाला, “आजी, हा काय प्रकार आहे, सांगा”. म्हातारी आजी घाबरून गेली. राजा म्हणाला, “घाबरू नका, पण मला सांगा, की तुम्ही दुध वाहात नाही तोवर गाभारा भारत नाही, असे का?” आजी म्हणाली, “महाराज, तुमची आज्ञाच चुकीची होती. सगळं दुध देवाला वाहिलं, आणि राज्यातल्या सगळ्या मुलांचे, वासरांचे प्राण तळमळले. आयांचे, गायी- म्हन्शींची आपल्या लेकरांसाठी तळतळ झाली. देवाला हे कसे आवडेल? म्हणून गाभारा भरला नाही. म्हणून, मुला- वासरांना दुध पाजावे, घरी सगळ्यांनी आनंदाने राहावे, आणि मग पहा, प्रत्येकाने थोडेसे दुध वाहिले, तरी गाभारा भरेल.”

राजाला आपली चूक समजली. त्याने सर्वांची माफी मागितली आणि आपला आदेश मागे घेतला.

खरंच आहे नाही का, घरातल्या लहान मुलांना, पशुप्रान्यांना उपाशी ठेवून देव कधी प्रसन्न होईल का? नाहीच मुळी!

माझी लेक म्हणते, “मम्मा, सगळ्याच आज्या अशाच हुशार असतात. आपली आजी पण देवाला आणि मला एकदमच लाडू खायला देते. ती म्हणते,तू पण माझी देवी आहेसच की !”

नागपंचमी ची गोष्ट.

नागपंचमी एकदम लाडकी.. एकतर आईच्या माहेरी मुलींचं खूप कौतुक व्हायचं या सणाला; तेच ती आम्हाला देत आली. माझं लहानपण कोकणात गेलं. तिथे तर नागोबांची भेट पावसाळ्यात अनेकदा व्हायचीच. पूर येवून गेला की हमखास पुढे २-३ साप बागेत फिरताना दिसायचे. नाही तर घरात कुठेही कौलाच्या वळचणीला, घड्याळावर, अंगणात, असे अचानक दर्शन द्यायचे. त्यामुळे, फारच श्रद्धेने नागाची पूजा करायचे मी तर, की बाबा रे, रक्षण कर, भक्षण नको. त्याच वेळी कोल्हापूर जवळच्या बत्तीस शिराळा येथील नागपंचमीला साप खरोखरीच पुजण्याच्या फोटोसहित बातम्या पेपर मध्ये भरभरून यायच्या..थ्रील वाटायचं एकदम. पण, या सगळ्यापेक्षा मुलगी म्हणून नटण्या –मुरडण्याचे जे लाड होत, त्याचे अप्रूप जास्त होते. नवीन फ्रौक, बांगड्या, नेलपोलिश, असल्या गोष्टींचं त्या त्या वयानुसार आकर्षण होतं..आणि आई जे तम्बीटाचे खमंग लाडू करत असे, त्यासाठी वर्षभर जी वाट पाहत असू, ती शब्दात सांगूच नाही शकत. ते लाडू खास कर्नाटकातले, ते खायला आमच्याकडे बरेच जणांचे नंबर लागलेले असत.

माझ्या मुलीला पण तेच कौतुक आम्ही सगळे मिळून करतो. तिला काही आमच्या सारखे मुक्त वावरणारे साप पहायचे भाग्य नाही. ही पिढी सर्पोद्यानामध्ये, आणि डिस्कवरी चैनेल वरच पाहणार साप वगैरे! पण आम्ही तिच्यासाठी मातीचा नागोबा आणून पूजा करतो. एक वर्षी तर तिनेच बनवला क्ले चा नागोबा!!

तिने बालकुतूहलाने विचारलेच, “मम्मा, नागाची पूजा का करतात?” मी म्हणाले, “अगं, त्यांनी त्रास देवू नये म्हणून आपण त्यांना प्लीज करायचं..आणि प्रॉमिस पण करायचं की आम्ही पण तुम्हाला त्रास देणार नाही! त्याची पण एक स्टोरी आहे बर का!” गोष्ट म्हटलं की आवडीचा विषय…मी लहानपणापासून ऐकलेल्या नागपंचमीच्या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट तिला तिच्या भाषेत सांगितली.

एकदा एका गावात एक शेतकरी होता. त्याच मोठ्ठं शेत होतं. मोठ्ठा परिवार देखील होता. त्याच्या शेतामध्ये नागाचं वारूळ होतं.

श्रावण महिना आला तसं त्याच्या सुना नागपंचमी सणासाठी माहेरी, आजोळी, गेल्या. पण सगळ्यात धाकटी सून होती तिला माहेरचे कोणीच नव्हते म्हणून ती खूप दुःखी होती. तिने मनोमन प्रार्थना केली की नागोबा माझा नातेवाइक आहे. तो येईल आणि मला माहेरी नेईल. तिची प्रार्थना आणि दुःख पाहून श्री शेषनागाला तिची दया आली. त्याने मनुष्य रूप घेतले आणि तिच्या घरी आला. शेतकऱ्याला आश्चर्य वाटले की हा कोण? कुठून आला? त्याने सुनेला विचारले तर तिने सांगितले, की हा माझा मामा. शेतकऱ्याने तिला मामाबरोबर माहेरी पाठवलं. मनुष्य रूपात आलेल्या नाग देवाने तिला आपल्या वारुळातल्या घरी  नेले; आणि त्याच्या बायको मुलांना तिची हकीकत सांगून सगळ्यांना ताकीद दिली की तिला कोणी चावू नये.

शेतकऱ्याची सून तिच्या या मामाच्या घरी मजेत रहात होती. एके दिवशी नागाची पत्नी जेंव्हा पिल्ले देवू लागली, तेंव्हा तिने आपल्या या भाचीला दिवा धरायला सांगितले. वळवळणारी पिल्ले पाहून तिला भीती वाटली व तिच्या हातून दिवा पिल्लांच्या शेपटीवर पडला. पिल्लांच्या शेपट्या भाजल्या. जरी नागीण रागावली तरी तिने मुलीला काही इजा केली नाही. पण तिने आपल्या नवऱ्याला सांगितले. नागोबा म्हणाला,”आपण तिला लवकरच तिच्या घरी पोहोचवू”. काही दिवसांनी नागोबाने पुन्हा मनुष्यरूप धारण केले, आणि मुलीला खूप खाऊ,  मिठाई , दागदागिने, भेटवस्तू, इ. देवून प्रेमाने तिच्या सासरी पोहोचवले.

पुढे नागाची पिल्ले मोठी झाली. त्यांनी आपल्या आईला विचारले, “आई, आमची शेपटी कशी तुटली गं?”. तेंव्हा नागिणीने त्यांना त्यांच्या जन्माच्या वेळची दुर्घटना सांगितली. नागाच्या मुलांना खूप राग आला आणि ते त्या मुलीचा, म्हणजे शेतकऱ्याच्या सुनेचा सूड घेण्यासाठी म्हणून तिच्या घरी आले. नेमका तो नागपंचमीचा दिवस होता. तिने पुष्कळ वेळ मागील वर्षी प्रमाणे आपल्याला न्यायला आपले मामा- भाऊ येतील म्हणून खूप वाट पाहिली. पण कोणीच आलं नाही. मग तिने पाटावर नागोबाचे चित्र काढले. त्याची पूजा केली. त्याला दुध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला. नागाची पिल्ले हे सगळं लपून पाहत होती. त्यांचा राग ओसरला. त्यांना आपल्या या मानलेल्या बहिणीचं वाईट वाटलं. त्यांनी रात्री त्या पूजेच्या पाटाखाली एक मस्त नवरतन हार ठेवला आणि ते तिला काहीही इजा नं करता, मनातून आशीर्वाद देवून निघून गेले. दुसरे दिवशी तिने तो हार पाहिला आणि तिला खात्री पटली, की तिचे मामा- भाऊ येवून गेले. आणि तिला खूप आनंद झाला.

“मम्मा, मला पण सख्खा भाऊ नाही. मग मी नागोबाची पूजा केली तर तो मला पण नेइल का वारुळात? मला पण हार मिळेल का?”

“हाहा, वारुळात नाही नेणार, आणि हार पण नको सोनूले आपल्याला, पण जेंव्हा तुला आयुष्यात कधी अडचण येईल काही, त्यावेळी, असाच देवाने तुझ्या साठी कोणा सदगृहस्थाला तुझा  भाऊ किंवा  मामा म्हणून पाठवावं मदतीला ..”

“म्हणजे नागोबा आपला राखी ब्रदर?!” तिचा पुन्हा प्रश्न…म्हटलं, “हो राणी, आपल्याला भाऊ नसले तरी असेच राखी ब्रदर च धावून येतात गरजेला.”

गोष्टीतील शेतकऱ्याच्या सुनेला जसे नागोबा प्रसन्न झाले, तसे तुम्हा आम्हा पण होवोत!

naagpanchami1

मनसेची गोष्ट.

मनसा ही कश्यप ऋषी आणि कद्रू यांची मुलगी. ती ब्रह्मदेवाची मानसपुत्री..म्हणून तिचे नाव मनसा असे पडले असावे. ती खूप विद्वान, तपस्वी होती. श्री महादेवाची शिष्या. तिने प्रचंड तप करून श्री विष्णूंची कृपा देखील मिळवली. ब्रह्मदेवांनी तिचा विवाह जातकरु ऋषींशी करून दिला. जाताकरुंची एकच अट होती की मनसेने त्यांची आज्ञा मोडायची नाही.

एकदा जातकरु ऋषी थकून दुपारी मनसेच्या मांडीवर डोके ठेवून पहुडले असता त्यांना खूप गाढ झोप लागली. संध्याकाळ झाली. त्यांची संध्या करायची वेळ टाळून जाऊ नये म्हणून मनसेने त्यांची झोप मोडली. ऋषी खूप रागावले..त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी चिडून तिला आपण एकत्र राहू शकत नाही असे सांगितले. तिने खूप गयावया केली, परंतु, ऋषींचा राग कमी होईना. मनसा आपल्या मानस पित्याकडे गेली. श्री ब्रह्मदेव, श्री महादेव, श्री विष्णू, सर्वांनी जातकरू ऋषींना समजावयाचा खूप प्रयत्न केला. पण, ते ऐकेनात. तेंव्हा देवानी त्यांना सांगितले, की कोणतेही लग्न स्त्रीला त्या लग्नापासून मातृत्व प्राप्त झाल्याशिवाय मोडता येणार नाही. तेंव्हा जातकरू ऋषींनी तिला मातृत्वाचे वरदान देवून तेथून ते निघून गेले.

गरोदर मनसेची पार्वती देवींनी काळजी घेतली. तिला पुत्ररत्न झाले. त्याचे नाव आस्तिक असे ठेवले. आस्तीकाने देखील ब्रह्मदेव आणि महादेवांकडून शिक्षण घेतले. त्याला त्याच्या वडिलांचा आशीर्वाद होता की तो मोठा पराक्रमी व त्यांच्या पेक्षा महान ऋषी होईल.

एकदा, जनमेजय राजाने सर्व सर्पांचा नाश करण्या साठी सर्पयागाचे आयोजन केले. जनमेजय हा परीक्षित राजाचा मुलगा. परीक्षिताला तक्ष नावाच्या सर्पाने दंश केल्यामुळे त्याचा मृत्यू झालं होता. त्याचाच सूड घेण्यासाठी जनमेजयाने हां यज्ञ करायचे ठरविले होते. या यज्ञाला सुरुवात झाली. त्यात सर्व सर्प आहुती पडले. परंतु, दक्षक मात्र आला नाही. राजाच्या सैनिकांनी माहिती आणली की दक्षकाला इंद्र देवाचे वरदान आहे व तो इंद्रासनाला वेटोळे घालून बसला आहे. जनमेजयाला राग आला. त्याने सर्व ऋषींना विनंती केली की असे मंत्रोच्चार करा की इंद्रसनासकट दक्षकाची आहुती पडावी. मंत्रोच्चाराच्या ताकदीने इंद्रासन जागचे हलले, व इंद्र, आणि दक्षकासकट यज्ञ स्थळी जाऊ लागले. इंद्राने व इतर देवांनी श्री ब्रह्मदेवाची प्रार्थना केली की इंद्रासन वाचवा. ब्रह्मदेवांनी मनसेची मदत घेण्यास सांगितले. मनसेने आपला पुत्र आस्तिक याला तो यज्ञ थांबवण्याची आज्ञा दिली. आस्तिकाने मोठ्या पराक्रमाने हा यज्ञ थांबवला. इंद्रदेव व त्यांचे इंद्रासन वाचले. इंद्रदेवानी मनसेचे आभार मानले. दक्षकाचे प्राण ही वाचले. त्याने तिला नागभगिनी असे संबोधले. तेंव्हापासून तिची आराधना नागाला प्रसन्न करून घेण्यासाठी करण्याची प्रथा पडली. काही ठिकाणी तिचा उल्लेख नागांची मानस बहिण असाही आहे.

नागचतुर्थी ची पूजा श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवशी केली जाते. मनसा देवीची प्रार्थना, नागाची पूजा, असे याचे स्वरूप असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप, इ. चा जास्त वावर असतो. त्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून ही पूजा केली जाते. भारताच्या विविध भौगोलिक भागांमध्ये या पूजेचे स्वरूप आणि कथा यात फरक आहे. परंतु, जिने नाग कुळाचा संहार थांबविला, तिची प्रार्थना केल्यास, नाग कुलापासून आपणास काही त्रास होणार नाही, ही यामागील श्रद्धा.manasadevi.jpg.sarpayaag

जिवतीची गोष्ट.

जिवती माता

श्रावण शुक्रवारी जिवती देवीची पूजा करतात. जिवती ही आपल्या मुला बाळांच रक्षण करते अशी पूर्वापार श्रद्धा आहे. माझी आजी खूप वृद्ध झाली तरी तिच्या आजोबा झालेल्या मुलांसाठी आणि घरातील सर्व मुलं जिथे आहेत तिथे सुखात राहोत म्हणून पूजा करायची. माझी आई देखील जिवती पूजन करायची आणि मला एकदम स्पेशल फिलिंग यायचं. कारण, आपल्या क्षेमकुशलासाठी आजच्या दिवशी पूजा आहे असं काहीसं वाटायचं.

मला मुलगी झाली आणि मीही श्रद्धेने श्रावण शुक्रवारी जिवती पूजन करू लागले. माझ्या लेकीला तेच स्पेशल फिलिंग द्यायची पण गम्मत वाटते. तिला उत्सुकता म्हणून जिवतीची गोष्ट सांगते. आजही या गोष्टीसारख्या किती तरी राण्या दुसऱ्याचे मूल चोरून आई होण्याचे सुख मिळवू पाहतात…ज्यांची मुलं त्यांच्यापासून दूर आहेत, त्यांना ही गोष्ट कदाचित ओळखीची, आपलीशी वाटेल.

एक मोठ्ठ आटपाट नगर होतं. राजा होता. पण दुर्दैवाने त्याला वारस नव्हता. तेंव्हा राणीने एका सुईणीला लालच देवून कोण गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर असेल तर तिचं बाळ मला आणून दे अशी योजना केली. त्या सुईणीने राज्यात लक्ष ठेवून अशी गरोदर स्त्री हेरून तिला मी मोफत तुझे बाळंतपण करेन मलाच बोलाव असे सांगून ठेवले. राणीने गरोदर असल्याचे सोंग घेतले…सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले की राजाला वारस येणार.

इकडे सुईणी ने त्या ब्राह्मण स्त्री च्या घरापासून राजवाड्यापर्यंत गुप्त भुयार बनवले. नऊ महिने संपताच, तिच्या बाळंत होण्याची वेळ आली…इकडे राणीनेही प्रसवकळाचे  नाटक केले. ब्राह्मण स्त्रीने एका गोंडस पुत्रास जन्म दिला..परंतु, सुईण फार हुशार. तिने तिचे डोळे बांधले असल्याने तिला कळले नाही आणि याचाच फायदा घेत ते बाळ राजवाड्यात पोचवले गेले..राजाला पुत्ररत्न…राजकुमार आला..सर्वांना आनंद झाला…पण, या ब्राह्मण स्त्रीला मात्र तुला मृत बाळ झाले असे सांगून फसवले..किती दुःख कोसळले तिच्यावर. तरीही तिने स्वतःला सावरले. श्रद्धेने ती दर श्रावण शुक्रवारी जिवती पूजा करत असे आणि अक्षत टाकून म्हणे,” माझं बाळ जिथे कुठे आहे, तिथे सुखरूप असुदे.” योगायोगाने, त्या अक्षता राजकुमाराच्या डोक्यावर पडत. कोणाला याचे रहस्य समजून येइना.

दिवसामागून दिवस, वर्ष गेली. राजकुमार मोठा झाला. एके दिवशी तो शिकारीला गेला असताना, त्याची नजर या ब्राह्मण स्त्रीवर गेली. ती सुंदर होती..राजकुमार मोहित झाला..पण, त्याच वेळी त्याचा पाय तिथे उभ्या वासराच्या पायावर पडला..ते वासरू दैवयोगाने म्हणाले,”कोणां पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला?” तेंव्हा त्याची आई म्हणाली, “जो आपल्या आईवर मोहित होण्याचे पाप करू शकतो, त्याला तुझ्या शेपटीची काय काळजी?” राजकुमाराने हे बोलणे ऐकले, त्याला खूप लाज वाटली. या पापाचे प्रायश्चित्त म्हणून तो काशीस निघाला. वाटेत प्रवासामध्ये त्याने एका ब्राह्मनाघरि मुक्काम केला. त्या ब्राह्मणाला खूप मुले झाली,  परंतु, ती जगत नव्हती; ५-६ वे दिवशी मृत्य पावत. त्या रात्री सटवी ब्राह्मणाच्या मुलाचा जीव घेण्यास आली. राजकुमार दारात झोपला होता. ती म्हणाली, “कोण झोपला आहे दारात?”. जीवती उत्तरली,” माझं बाळ आहे ते. त्याला ओलांडू देणार नाही मी.” ब्राह्मण खूप चिंतेत होता. की आज रात्री कदाचित आपले बाळाचा मृत्यू होणार. पण, त्याने हे बोलणे ऐकले आणि त्याला आनंद झाला. त्याचे मूल जगले. दुसरे दिवशी त्याने राजकुमाराचे आभार मानले की तुमच्यामुळे माझे बाळ जगले. आजचे दिवस अजून मुक्काम करावा. राजकुमाराने ते मान्य केले. पुढे राजकुमार काशीस गेला. आणि हां मुलगा मोठा झाला.

राजकुमाराने काशीयात्रा केली. पिंडदान करते वेळी पिंड घेण्यासाठी पाण्यातून दोन हात वर आले. त्याला याचे कारण उमजेना. तेथील पंडितांनी सांगितले, घरी गेल्यावर गाव जेवण घाल. तुला याचे कारण कळेल. त्याने परत येऊन ही गोष्ट आपल्या आई वडिलांना सांगितली व गावजेवणाचा बेत घातला. सर्व जण येऊ लागले. परंतु, राजकुमाराची खरी आई, ब्राह्मण स्त्री मात्र येयीना. तिला खास बोलावणे धाडले. ती परान्न घेत नसे. परंतु, खूप आग्रह केल्यावर ती कबुल झाली. पंगतीमध्ये जेवायला तूप वाढायला जसे राजकुमार समोर आला, तसे तिला पान्हा फुटला..राजकुमार ओशाळला. त्याला हे कळेना..राणीच्या लक्षात सर्व प्रकार आला, तिने सुईणीला बोलावून खात्री केली की ती हीच स्त्री आहे जिचे बाळ आपण चोरून आणले होते. राणीने मोठ्या कष्टाने ही गोष्ट राजकुमाराला सांगितली. राजकुमाराला खूप आनंद झाला. त्याने आपल्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यांना मोठ्या सन्मानाने मोठा राजवाडा बांधून दिला व सर्वजण सुखाने राहू लागले.

त्या ब्राह्मण स्त्री ने खूप श्रद्धा ठेवली, की आपले बाळ जीवित आहे व आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच भेटेल. ती श्रद्धा फळाला आली. तिला जसे तिचे बाळ सुखरूप भेटले, तसे आपली मुलेबाळे सुखरूप राहोत, आपल्या जवळ राहोत हीच प्रार्थना.

आज आपण पाहतो, राजे महाराजे नसतील, तरी ज्यांना पैशाचा वापर करून दुसऱ्याचे सुख ओरबाडून घेणे शक्य आहे अशा प्रवृत्तीचे लोक आजही अस्तित्वात आहेत व ते तसे करतात देखील. परंतु, देव किंवा जी एक अदृश्य शक्ती आहे, ती कधीना कधी पीडिताला न्याय नक्कीच मिळवून देते.

या गोष्टी मधील व्रताला काही लोक अंधश्रद्धा, कर्मकांड म्हणून कमी देखील लेखतील, परंतु, कोणीही हे नाकारणार नाही, की धर्म, जात पात, आधुनिक विचार इ., यापलीकडे जावून पाहाल, तर प्रत्येक आई बाप, आपल्या मुलांचे कुशलक्षेम आणि आनंदाचे दीर्घायुष्य याची प्रार्थना नक्कीच करतात.

माझ्या लेकीने मला ही गोष्ट ऐकून विचारले, “मम्मा, मी शिकायला म्हणून होस्टेलला गेले, तरी देखील माझ्या डोक्यावर तू टाकलेल्या अक्षता पडतील?”..म्हंटलं, “हो बाळा, तू कितीही लांब गेलीस, तरी माझी प्रार्थना, माझे आशीर्वाद, या रूपात त्या अक्षता सतत तुझ्या डोक्यावर असतील.” यावर ती खुदकन हसली, आणि कुशीत शिरली.