बुध हा बृहस्पतीचा मुलगा. व्यापाऱ्यांचा देव व त्यांचे रक्षण करणारा. त्याचा वार बुधवार असे मानतात. त्याला व बृहस्पती देवाला प्रसन्न करून घेण्याबद्दलची श्रावणात सांगितली जाणारी एक गोष्ट..
एका नगरात एक श्रीमंत माणूस राहात होता. त्याला सात मुलगे होते व सात सुनाही होत्या, असं मोठ्ठं कुटुंब होतं. त्यांच्या कडे रोज एक मामा-भाचे भिक्षा मागण्यास जात असत. त्याच्या सुना आमचे हात भिक्षा घालण्यास रिकामे नाहीत म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस झाल्यावर त्यांच्या घरी दारिद्र्य आलं. सर्वांचे हात खरंच रिकामे झाले. मामा- भाचे पुन्हा भिक्षा मागण्यास आले तेंव्हा सुनांनी सांगितलं, असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले. सर्वात धाकटी सून थोडी विचारी आणि शहाणी होती. तिने विचार केला, की जेंव्हा होतं तेंव्हा दिलं नाही. आता नाही म्हणून भिक्षेकरी विन्मुख जातात. तिने मामा- भाचे यांच्या पाया पडून त्यांची माफी मागितली. आणि पुन्हा पूर्वीसारखे ऐश्वर्य यावे यासाठी उपाय सांगण्याची विनंती केली.
त्यांनी सांगितले, श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी (गुरुवारी) एका भुकेल्या माणसाला जेवू घाल. तुला जे पाहीजे असेल त्याची मनापासून इच्छा कर, पाहुण्यांच्याशी चांगलं वाग..त्यांचा सन्मान कर. म्हणजे इच्छित गोष्टी पूर्ण होतील. त्याप्रमाणे धाकटी सून करू लागली.
एके दिवशी तिला स्वप्नं पडलं की तिच्या घरी जेवणावळ आहे, आणि चांदीच्या भांड्यातून तूप वाढते आहे. हे तर त्यांचे वैभव परत आल्याचे लक्षण..तिने खूप आनंदाने आपले स्वप्न जावांना सांगितल्यावर त्या हसू लागल्या. तिची थट्टा केली. पण त्यावेळी एक चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराच्या राजाचा मृत्यू झाला. दुसऱ्या राजाला गादीवर बसवल्याशिवाय अंत्यसंस्कार करायचे नाहीत म्हणून तेथील लोकांनी एका हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली वर तिला नगरात फिरवले. ज्याच्या गळ्यात ती माळ घालेल, त्याला राज्याभिषेक होयील अशी दवंडी पिटवली. हत्तीणीने नेमकी हिच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली. पण याचा दरिद्री अवतार पाहून राजवाड्यातील मंडळीनी त्याला हाकलून लावले. पुन्हा हत्तीणीला फिरवले. तिने पुन्हा याच्याच गळ्यात माळ घातली. असे दोनदा झाल्यावर मात्र यालाच राज्याभिषेक करून राजाच्या गादीवर बसवले. त्याने आपल्या घरच्यांची चौकशी करवली असता आता ते अन्न-धान्याची कमतरता होवून देशोधडीला लागल्याचे समजले.
राजाने एका मोठ्या तलावाचे काम सुरु केले. तिथे रोजगारासाठी हजारो मजूर खपू लागले. त्यात त्याच्या घरातील लोक सुद्धा होते. त्याने आपली पत्नी ओळखली, आणि त्याला आनंद झाला. तिने त्याला तिला पडलेल्या स्वप्नाची हकीकत सांगितली. देवाने देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजाने तिचे स्वप्न लक्षात ठेवून, गाव – भोजनाचा कार्यक्रम ठेवला आणि वाढण्यासाठी तिच्या हातात चांदीच्या भांड्यात तूप दिले. लोक जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं. राजाने त्यांचाही सन्मान केला. त्यांचा परिवार वाढला. मुलं बाळ झाली. दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस परत आले. तिला जसे बुधबृहस्पती प्रसन्न झाले, तसे तुम्हा आम्हा होवोत!
टीप : आपण आज बुधबृहस्पतीच्या मूळ कथेप्रमाणे पूजा अर्चा करणार नाही. परंतु, आपल्या घासातला एक घास कोण गरजूला नक्कीच देवू शकतो. आपल्या कडे असताना ‘नाही आहे’ म्हणणे हे मनाचे दारिद्य नव्हे का? आपल्याकडे असताना नाही म्हणणे यामुळे कदाचित आपल्याकडे जे आहे ते नाहीसे होऊ शकते. अर्थात, ती वेळ कोणावरच नं येवो.
गोष्टीमधील स्त्रीच्या नवऱ्याच्या गोष्टी बद्दल म्हणाल, तर आज हीच परिस्थिती आहे. एकादे पद रिकामे झाले, की आंधळे पणाने नवीन व्यक्ती शोधून जागा भरण्यात येते. मग ती व्यक्ती आपल्या जिवलगांना / नातेवाइकांना कोणत्या तरी सरकारी योजनेमार्फत काम मिळवून देते..एकूण काय, सर्वांचे भलेच होते!!
आपण या गोष्टी मुळे एक व्रत नक्कीच घेऊ शकतो…आपल्या घासातला घास गरजूला द्यायला नाही म्हणूया नको!